औरंगाबाद - महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने वनडे स्पर्धेसाठी पश्चिम विभाग महाराष्ट्राचा १६ सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला. संघाच्या कर्णधारपदी रोहित मोटवाणीची निवड करण्यात आली आहे. संघात नाशिकचा गोलंदाज साजीन सुरेशनाथ याची पुन्हा एकदा निवड झाली आहे. मध्यंतरी गोलंदाजीतील लय काहीशी दुरावल्याने तो रणजी संघातून बाहेर झाला होता. निमंत्रितांच्या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी करत संघात पुनरागमन केले. औरंगाबादचा स्टार फलंदाज अंकित बावणेनेदेखील संघातील स्थान कायम राखले. त्याने नुकतेच दुलीप ट्रॉफीत पश्चिम विभागाकडून खेळताना पूर्व विभागाविरुद्ध दमदार ११५ धावांची खेळी केली. जालन्याचा युवा फलंदाज विजय झोलला संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा पहिला सामना गुजरातविरुद्ध ९ नोव्हेंबर रोजी, दुसरा बद्योदाविरुद्ध ११ नोव्हेंबर रोजी, मुंबईविरुद्ध १२ नोव्हेंबर रोजी आणि सौराष्ट्राविरुद्ध १४ नोव्हेंबर रोजी होईल. सर्व सामने अहमदाबादला खेळवले जातील.
संघ पुढीलप्रमाणे : रोहित मोटवाणी, हर्षद खडिवाले, विजय झोल, केदार जाधव, अंकित बावणे, निखिल नाईक, संग्राम अतितकर, राहुल त्रिपाठी, स्वप्निल गुगळे, निखिल पराडकर, समद फल्लाह, डोमोनिक मुथ्यास्वामी, अनुपम संकलेचा, सजीन सुरेशनाथ, अक्षय दरेकर, शमशुद्दीन काझी.