आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Artical On Ramakant Acharekar And Sachin Tendulkar

आचरेकर सरांचा पट्टशिष्य सचिन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुर्ब्रह्मा..गुरुर्विष्णू... हा मंत्र गुरुजनांची महती स्पष्ट करतो ते उगाच नव्हे. कारण मातीच्या गोळ्याला मूर्तीचे रूप देण्याचे काम गुरू करत असतो. अशाच प्रकारे एका सामान्य उंचीच्या माणसाला क्रिकेटच्या सर्वोच्च उंचीवर पोहोचवून ईश्वराचा दर्जा मिळवून देण्यातही एका गुरूचाच हात आहे आणि ते गुरू म्हणजे लहानशा सचिनला महान बनविणारे रमाकांत आचरेकर...
सचिन अकरा वर्षांचा असताना त्याचा भाऊ अजित तेंडुलकरने त्याला शिवाजी पार्कवर आणले आणि अनेक प्रतिभावान खेळाडू घडवणा-या रमाकांत आचरेकर सरांच्या हवाली केले. त्या लहानशा मुलाला पाहून आचरेकर विवंचनेत पडले होते. हा चिमुरडा लेदर बॉलने क्रिकेट खेळेल तरी कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. नंतर त्यांनी सचिनला इतरांचे निरीक्षण करण्यास सांगितले; परंतु दुस-याच क्षणी त्यांना एक साक्षात्कार झाला. सचिन केवळ इतर खेळाडूंच्या निरीक्षणासाठीच मैदानात उतरला नाही, तर त्याने लेदर बॉलने काही सुरेख झेल पकडले. त्याचक्षणी आचरेकर सरांना सचिनची प्रतिभा लक्षात आली. दुस-याच दिवशी सरांनी सचिनच्या प्रशिक्षणाचा श्रीगणेशा केला आणि सोबतच एक नव्या पर्वाचाही आरंभ झाला. शिवाजी पार्कवर आपल्या आयुष्यातील पहिला सामना खेळताना भविष्यातील महान फलंदाज भोपळा न फोडताच बाद झाला होता. इतकेच नव्हे, तर दुस-या सामन्यातही त्याच्या पदरी अपयशच पडले आणि शून्याने त्याची साथ सोडली नाही.
...अन डोळ्यातून रक्त यायला लागले
एकदा आचरेकर सर मैदानावर नाहीत हे बघून तो यष्टिरक्षण करायला लागला. परंतु वेगवान गोलंदाजाने टाकलेला पुढील चेंडू थेट सचिनच्या डोळ्यावर जोरदार आदळला. डोळ्याला जबर जखम झाली आणि भळाभळा रक्त यायला लागले. मित्रांनी कसेबसे त्याला दवाखान्यात नेले आणि उपचार केला. एक महान क्रिकेटर बनण्याची प्रक्रिया येथूनच सुरू झाली होती आणि याचा प्रत्यय या जखमेनंतर दुस-याच दिवशी आला. डोळ्याला पट्टी लावून सचिन थेट मैदानावर हजर. या वेळी आचरेकर सरांनी त्याला सांगितले की, एकाच वेळी अनेक गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित कर. सचिनने तेच केले आणि त्याचे फळ आज जगासमोर आहे.