आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कसोटी क्रिकेटलाही ‘गुलाबी’ दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दशकांच्या तुलनेत सध्या क्रिकेट अधिकाधिक रोमहर्षक होत आहे. एकदिवसीय तसेच टी-२० तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आता कसोटीही कात टाकायच्या बेतात आहे. आयसीसीने गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटीचा बेत रचून या निरस प्रकाराला रोमांचक बनवण्याचे ठरवले आहे. या प्रयत्नामुळे कसोटीचा प्रेक्षक टीव्हीचे डोळे आणि रोडिओचे कान घेऊन प्रत्यक्ष मैदानात येईल.

कसोटी असो वा एकदिवसीय दोन्ही प्रकारांत सनसनाटी निकाल लागत आहेत. ताजे उदाहरण भारत-झिम्बाब्वेतील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे. भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत थांबावे लागले. भारताने चार धावांनी सामना जिंकला असला, तरी मने झिम्बाब्वेने जिंकली. थोड्याच दिवसांपूर्वी बांगलादेशने भारताला घरच्या मैदानावर पाणी पाजले. बांगलादेश दौऱ्यात तर धोनी-कोहलीसारखे आठ दिग्गज गेले होते. दुसरे उदाहरण आशिया खंडातील आहे. श्रीलंका-पाकिस्तान कसोटीत ३७७ धावांचे महाकठीण आव्हान मोहंमद युनूसच्या कर्तबगारीने पाकने गाठले. कार्डिफमध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड पहिली कसोटीही रोमहर्षक होत आहे. ही मालिका एकतर्फी होणार नाही, याचे संकेत मिळू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही संघांतील कसोटी सामने रोमहर्षक होत आहेत. न्यूझीलंड-इंग्लंड आणि भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतही जबरदस्त थरार होता. मात्र, वेस्ट इंडीजने खेळलेल्या प्रत्येक कसोटीत जोश नव्हता. विंडीजचे दु:ख आपण समजू शकतो. खेळाडूंना मानधन िमळालेले नाही. त्यांच्या संघटना खेळाडूंचे हित जोपासू शकत नाहीत. त्यामुळे खासकरून कसोटी खेळण्यात मन कसे लागेल?

आधुनिक फलंदाजांच्या दणकेबाज प्रहारांमुळेही क्रिकेट चित्तथरारक होत आहे. तरुण फलंदाज धोका पत्करून चेंडू ठोकायला मागे-पुढे पाहत नाहीत. हे सितारे वनडेची शैली कसोटीतही आजमावत आहेत. ते क्षेत्ररक्षणही लाजवाब करतात. त्यामुळे क्रिकेट प्रेक्षणीय होत आहे. दुसरीकडे सामन्याचा निकालही लागत आहे. कसोटीत घटत्या प्रेक्षकसंख्येवर आक्रमक क्रिकेट हाच उपाय ठरावा. किशोरकुमार रित्या सभागृहात कधी गाणे गायील काय? मग क्रिकेटमध्येच रिकाम्या खुर्च्या का? तुडुंब मैदानासाठी क्रिकेट रोमहर्षक बनवावे लागेल. पाक-लंका कसोटीला प्रेक्षकांनी फारसे महत्त्व दिले नाही. पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय क्रिकेटचे दिवाने आहेत. एकदिवसीय क्रिकेटने लोकांवर गारूड केले आहे, क्रिकेटपटूही खोऱ्याने पैसे कमावत आहेत हे सत्य. मात्र, कसोटी क्रिकेटचा तो सुवर्णकाळ परत आणावा लागेल. आयसीसीचे कसोटीला लकाकी, झळाळी देण्याचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.
बातम्या आणखी आहेत...