आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Indian Superleague Football By Ayyaz Memon

'आयएसएल'द्वारे फुटबॉलला नवी दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात आयपीएलच्या धर्तीवर इंडियन सुपरलीग फुटबॉलची सुरुवात रविवारपासून होत आहे. कोलकात्यात उद्घाटन सोहळा बॉलीवूडच्या स्टाइलमध्ये धूमधडाक्यात होईल. याप्रसंगी मी सांगू इच्छितो की, भारतात गेल्या १२५ वर्षांपासून फुटबॉल खेळला जात आहे. मात्र, या खेळात आपण अजूनही खूप मागे आहोत. आपल्या बॉलीवूडमधील आणि क्रिकेटच्या ता-यांनी फ्रँचायझी संघांत भागीदारी घेऊन या खेळाला देशात पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी धनुष्य उचलले आहे. हे कार्य प्रशंसनीय आहे.

भारतात फुटबॉल शाळा, कॉलेजच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर खेळला जाणारा खेळ आहे, यात शंका नाही. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर जवळपास एक दशक भारतात क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल लोकप्रिय होते. भारताने १९५१ मध्ये पहिल्या एशियन गेम्सच्या फुटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. १९५६ च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलपर्यंत धडक दिली होती. फुटबॉलमध्ये इतके मोठे यश मिळाल्यानंतरही देशात आश्चर्यकारकपणे या खेळाची घसरण झाली. आता तर परिस्थिती इतकी बिकट आहे की, ऑलिम्पिक, वर्ल्डकप सोडा, आशियाच्या टॉप-१० मध्येसुद्धा भारताचा समावेश नाही. कोणत्याही खेळाच्या पतनाला एका खेळाडूपेक्षा त्या संघटनेचे फेडरेशन जबाबदार असते. फुटबॉल फेडरेशनमध्ये पदाच्या लालसेपोटी खेळाच्या जाणकार नसलेल्या, मात्र सत्तेचे लोभी असलेल्या व्यक्ती पदाधिकारी झाल्या आणि फुटबॉलची घसरण होत गेली. फेडरेशनच्या अधिका-यांनी खेळ आिण खेळाच्या विकासाकडे लक्ष देण्याऐवजी राजकारण केले. फेडरेशनच्या अधिका-यांनी वेळेनुसार आपली विचारसरणी अपग्रेड केली नाही. या अधिका-यांची कसलीच सुनिश्चित योजना नसल्यामुळे भारत फिफा क्रमवारीत घसरून १५८ व्या क्रमांकावर पोहोचला. याविरुद्ध भारतापेक्षा कमी लोकसंख्येचे देश कोस्टारिका, कॅमरून, घाना, क्रोएशिया क्रमवारीत पुढे पोहोचले. या संघांनी वर्ल्ड कपमध्येसुद्धा प्रवेश केला. भारतात फुटबॉलला प्रतिकूल वातावरण असताना लीगची सुरुवात होत आहे. जे कार्य प्रफुल्ल पटेल व त्यांच्या फेडरेशनला करता आले नाही, ते कार्य क्रिकेट व बॉलीवूडचे तारे सचिन, गांगुली, धोनी, विराट कोहली, हृतिक रोशन, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर करीत आहेत. यांनी फुटबॉलचे संघ खरेदी करून या खेळाला देशात लोकप्रिय करण्यासाठी जबाबदारी घेतली आहे. पुढच्या दहा वर्षांत आपल्याला वर्ल्डकप फुटबॉल पात्रता मिळवता यावी, हा हेतू आहे. काही जण प्रश्न विचारत आहेत की, ज्या विदेशी खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले आहे, त्यात बहुतेक वयस्क खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या युवा खेळाडूंना लाभ कसा होणार ? माझ्या मते, एखाद्या नव्या कामाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच टीका करणे योग्य नाही. विदेशी खेळाडूंमुळे काहीच लाभ होणार नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. जे विदेशी खेळाडू खेळण्यासाठी आले आहेत, ते खूप अनुभवी आहेत. ते आपल्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करू शकतील. आएमजी-रिलायन्सचीही स्तुती करावी लागेल की त्यांनी एका व्यावसायिक फुटबॉल लीगची जबाबदारी स्वीकारली. याचे परिणाम नंतर दिसतील. आयसीएलच्या माध्यमातून आता देशी हीरो चमकतील. सोबतच आठ फ्रँचायझी संघांच्या अकादमीतूनही युवा खेळाडूंचे पीक निघेल. याचा भविष्यात लाभ होईल.