आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन आय: 'बॅड'मिंटन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंधुत्व, मैत्री आणि खिलाडूवृत्तीच्या भावनेने एकवटणार्‍या शेकडो वर्षांच्या परंपरेला मंगळवारी लंडन ऑलिम्पिकमध्ये बट्टा लागला. चीनच्या महिला जोडीविरुद्ध पुढची फेरी खेळायला नको म्हणून दोन कोरियन जोड्या, एक इंडोनेशियन जोडी आणि एका चिनी जोडीने प्रयत्न करून आपापले सामने गमावले. ही एका प्रकारची निकालनिश्चितीच आहे. क्रिकेटला या रोगाने पूर्णपणे ग्रासले आहे. मात्र, क्रिकेटपटूंनी तो रोग आर्थिक प्राप्तीसाठी स्वत:ला लावून घेतला. ऑलिम्पिकमध्ये अजून तरी पदक आणि प्रसिद्धी यापेक्षा पैशाला महत्त्व आले नाही. चार वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये हीरो होण्याचे स्वप्न बाळगून कित्येक वर्षे तयारी केली जाते. ती तपश्चर्या ऑलिम्पिकमध्ये अजून तरी पैशात विकली जात नाही.
महिला बॅडमिंटनपटूंचे वर्तन अक्षम्य होते. मात्र, आर्थिक लाभापेक्षाही चीनच्या अव्वल जोडीला टाळण्यासाठी ते पातक केले गेले. सुवर्णपदकासाठी किंवा ऑलिम्पिक पदकाच्या हव्यासापायी केलेला तो प्रमाद मानता येईल. असे प्रकार जगात सर्वत्र घडतात. आपल्या येथील कबड्डी, खो-खो स्पर्धेपासून अन्य खेळांमध्ये एकमेकांना संधी देण्याची वाईट प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. बॅडमिंटन संघटनेने घेतलेल्या निर्णयापासून भारतातल्या क्रीडा संघटनांनी बोध घेण्याची गरज आहे.
भारतातच नव्हे, तर जगात सांघिक खेळात सर्वत्र असे प्रकार सुरू असतात. जपान, कोरिया, चीन, इंडोनेशिया एवढेच नव्हे, तर अमेरिका, युरोपातील फुटबॉल स्पर्धांमध्येही एकमेकांना साहाय्य करणे हा डावपेचांचा भाग मानला जातो. मात्र, ऑलिम्पिक खेळांसारख्या एका पवित्र आणि पारंपरिक चळवळीत असे प्रकार करण्याचे धारिष्ट्य दाखविले जाईल, अशी कुणी अपेक्षा केली नव्हती. विश्व बॅडमिंटन संघटनेचे महासचिव थॉमस लुंड यांनी यासंदर्भात सांगितले, हा पहिलाच अपराध होता, म्हणून खेळाडूंची कारकीर्द न संपवण्याचा निर्णय आम्ही घेतला नाही. या ऑलिम्पिक स्पर्धेपुरतेच या खेळाडूंना बाद करण्यात आले. मात्र, अशा कोणत्याही प्रकारच्या अपप्रवृत्तींना बॅडमिंटन संघटना आणि ऑलिम्पिक चळवळ थारा देत नाही, हे आम्हाला दाखवायचे होते. बॅडमिंटन संघटनेने खेळाडूंना तसे करायला लावणारे प्रशिक्षक, व्यवस्थापक किंवा त्यांच्या संघाला मोकळे सोडले. खेळाडूंपेक्षाही त्यांचे कर्तेकरविते असणारे प्रशिक्षक व व्यवस्थापक अधिक दोषी होते. मॅचफिक्सिंगच्‍या या नाट्यात भारतानेही स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. बॅडमिंटन संघटनेने आठ खेळाडूंवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर भारतीयांना जाग आली. त्यांनी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना या कारवाईचा लाभ होईल म्हणून जपानविरुद्ध निकालनिश्चितीची तक्रार केली. पथकप्रमुख, व्यवस्थापक आणि आयओएचे हंगामी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांपैकी कुणालाही तक्रार करतानाचे नियम ठाऊक नसावेत, याचे आश्चर्य वाटते. भारताची तक्रार फेटाळण्यात आली. भारताच्या अशा अनेक तक्रारींना लंडन ऑलिम्पिक मध्ये केराची टोपली दाखविण्यात आली आहे. बॉक्सिंग, हॉकी या खेळात आणि संचलनाच्या वेळी दाखवलेल्या अनास्थेबाबत भारताने तक्रारी केल्या होत्या. भारतीय पथकाच्या बाबतीत येथे आनंदीआनंदच आहे. पथकप्रमुखांपासून कुणाकडेही आवश्यक माहिती उपलब्ध नसते. पदक मिळाले की धावतपळत येणारी ही सारी मंडळी एरवी कुठे असतात?