महेंद्रसिंग धोनी तब्बल सहा वर्षे सर्वच स्वरूपात कर्णधार राहिला आणि यादरम्यान त्याचे संघावर पूर्ण नियंत्रण होते. मात्र, कसोटीतील त्याच्या अचानक निवृत्तीने थोडा बदल झाला आहे. आता त्याचा दबदबा कमी झाला आहे. अशात धोनी आता ड्रेसिंग रूममध्ये स्वत:ला पुन्हा कसा प्रस्थापित करतो, यावर विश्वचषकात भारताचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल.
जुनी शक्ती किंवा तसा दबदबा पुन्हा पुन्हा मिळवण्याचे आव्हान धोनीपुढे असेल. त्याने कसोटीला अलविदा म्हटले असले तरीही वनडेतील त्याच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. यात दुमत नाही की मर्यादित षटकांच्या खेळात तो देशाचा सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये
आपली भूमिका कमी झाल्याचे धोनीला आता मान्य करावेच लागेल.
याशिवाय त्याला आपले मॅन मॅनेजमेंट स्किलसुद्धा वाढवावे लागेल. कारण खेळाडूंसमोर आता सत्तेचे दोन केंद्रबिंदू झाले आहेत. हे दोन्ही वेगवेगळ्या स्वरूपात का असेना. या परिस्थितीशी ताळमेळ बसवणे वाटते इतके सोपे नसते. आफ्रिकेत सहजपणे घडले म्हणून सर्वत्र असेच होईल, गरजेचे नाही. आफ्रिकेत ग्रॅमी स्मिथच्या निवृत्तीनंतर हाशिम आमलाला कसोटीचे तर डिव्हिलर्सला वनडेचे कर्णधार बनवण्यात आले. या निर्णयानंतरही या दोन्ही खेळाडूंचे प्रदर्शन अधिक चांगले झाले, हे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना आपली जबाबदारी समजण्यास आणि सांभाळण्यास सोपे गेले.
कसोटी, वनडेत वेगवेगळे कर्णधार, ही प्रथा नवीन नाही. (आफ्रिकेत तर ३ कर्णधार आहेत.) याचे परिणाम संमिश्र आहेत. आता आफ्रिकेला याचा लाभ होत असला तरीही नेहमीच असे घडले नाही. कर्णधाराचे ओझे कमी व्हावे, हा एकमेव हेतू वेगवेगळे कर्णधार निवडण्यामागे आहे. यामुळे कर्णधाराला वेगवेगळ्या स्वरूपात वेगळी रणनीती करायची गरज पडत नाही
आणि खेळाडूंशी ताळमेळ बसवण्याचीही अडचण दूर होते. ब-याच वेळा तर एका स्वरूपाच्या कर्णधाराला दुस-या स्वरूपाच्या संघात स्थान मिळत नाही. आपापल्या संघांचे कर्णधार राहिलेले अॅलेस्टर कुक आणि डेवेन ब्राव्हो सध्या विश्वचषकाबाहेर आहेत. क्लार्कच्या अनुपस्थितीत कांगांरूच्या वनडे संघाची जबाबदारी सांभाळणा-या जॉर्ज बेलीला कसोटीत
स्थान नाही.
एखाद्या कर्णधाराने स्वत:हून एखाद्या स्वरूपाचे नेतृत्व सोडण्याचीही उदाहरणे आहेत. क्लार्कने टी-२० आणि धोनीने कसोटीचे नेतृत्व सोडणे, याचे उदाहरण आहे. मात्र, धोनीचे प्रकरण वेगळे आणि वादग्रस्त आहे. खेळातील सर्वश्रेष्ठ स्वरूप अर्थात कसोटीचे नेतृत्व धोनीने सोडल्याचे बोलले जाते. पारंपरिक दृष्टीने बघितले तर त्याने मोठ्याऐवजी छोटी जबाबदारी स्वीकारली. विश्वचषक तोंडावर असल्याने यावर दुमत शक्य आहे. वर्ल्डकपचे आव्हान बघता धोनीने योग्य निर्णय घेतला, असे म्हटले जाऊ शकते. गतचॅम्पियन असल्याने भारताला किताब
वाचवण्याची जबाबदारी आहे. स्पर्धेपूर्वी धोनीने आपले पूर्ण लक्ष वनडे आणि टी-२० वर केंद्रित केले आहे. यामुळे चाहत्यांच्या आणि प्रशासकांच्या अपेक्षा वाढतील. दुर्दैवाने सुमार कामगिरी झाल्यास त्याचा विश्वास वेगाने ढासळेल, हेसुद्धा खरे आहे. अशा परिस्थितीत खेळाडू आणि कर्णधार म्हणून आजही टॉपवर असल्याचे आणि कसोटी निवृत्तीचा निर्णय योग्य असल्याचे धोनीला सिद्ध करावे लागेल.