आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On India Pakistan Matches By Ayyaz Memon

विक्रम अबाधित राखण्यासाठी प्रार्थना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वचषक सामन्यात भारत-पाकिस्तानचे संघ पाच वेळा आमने-सामने आले. पाचही वेळा भारतानेच विजय मिळवला. भारताच्या खात्यात ही अशी उपलब्धी आहे, जी कायम राहावी म्हणून चाहते प्रार्थना करतील. तिकडे पाकिस्तानी चाहतेही विजयाची आस लावून बसले आहेत. मात्र या विजयातील संस्मरणीय सामना कोणता?
मी याबाबत काही मित्र तसेच पत्रकारांत छोटेखानी सर्वेक्षण केले. निष्कर्ष दोन सामन्यांभोवतीच फिरत होते. १९९६ मध्ये बंगळुरूत झालेला उपांत्यपूर्व सामना तसेच २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनमध्ये झालेली लीग मॅच.
या दोन्ही सामन्यांत कडवा संघर्ष झाला. बंगळुरूत वकार युनूसच्या खतरनाक गोलंदाजीला अजय जडेजाने लीलया भिरकावले ते कसे विसरता येईल? याचीच झलक व्यंकटेश प्रसादने गोलंदाजीतून पेश केली. आमिर सोहेलला बाद करून पाकच्या दणकेबाज सलामीला सुरुंग लावला. २००३ चा विजयही तितकाच रोमहर्षक होता. त्या वेळी होता विक्रमादित्य सचिन तेंडुलकर. आपण २७३ धावांचा पाठलाग करत होतो. सचिनच्या फलंदाजीची अभेद्य भिंत उभी राहिली. एक बाजू लावून धरून त्याने अविश्वसनीय खेळी साकारली. विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार विजय कोणता? असे विचाराल तर मी सिडनीचे नाव घेईन. १९९२ मध्ये हा सामना झाला होता. त्या सामन्याच्या धावफलकावर नजर टाकल्यास आपल्याला दिसेल की मोहंमद अझरुद्दीनच्या नायकत्वाखाली आपण केवळ ४३ धावांनी जिंकलो होतो. मग तुम्ही म्हणाल यात विशेष काय? मात्र या विजयाचे अपरंपार महत्त्व आहे. का आणि कसे हे आता सांगतो.
दोन्ही देशांतील मर्यादित षटकांच्या सामन्याचा विचार करता अनेक सामने संस्मरणीय झाले आहेत. यात दोन टर्निंग पॉइंट आहेत. पहिला - आशिया चषकात १९८६ मध्ये शारजात झालेला सामना. तेव्हा जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर चषकार चढवून सनसनाटी विजयाची नोंद केली. भारतीय खेळाडूंच्या मनात मियाँदादचा या षटकाराची भीती कित्येक वर्षे कायम होती. भारताने १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करून हा दबाव झुगारून लावला. खेळाच्या मानसिकतेतून विचार केल्यास सामन्याचा हा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. या सामन्यात मियाँदाद प्रमुख घटक होता. भारतीय गोलंदाज तसेच क्षेत्ररक्षकांनी शानदार कामगिरी केली. मियाँदादला सा-यांनी जखडून ठेवले. तो पुरता वैतागून गेला होता. याचदरम्यान यष्टिरक्षक किरण मोरेशी त्याची ठिणगी पडली. (मियाँदादच्या माकडउड्या कोण विसरेल?) इतकेच नाही, याची परिणती इम्रान खान धावबाद होण्यात झाली.
एकवेळ ४ बाद १३० असणारा पाक संघ १७३ वर ऑलआऊट झाला. मियाँदादने कडवा संघर्ष केला. ११० चेंडंत ४० धावांची संयमी पण धीरोदात्त खेळी केली. या दृष्टिकोनातून पाहिले तर असेही म्हणता येईल की त्याला शारजातील १९८६ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची होती. आता भारतीय नजरेतून पाहू. जी व्यक्ती कैक वर्षे शिकारी होती, ती स्वत: आपसूक शिकार बनली. ते माकड पुन्हा एकदा त्यांच्या पाठीवर बसले. पुन्हा पाकिस्तान चारीमुंड्या चीत झाला.