आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Indian Cricket Team By Ayyaz Memon, Divya Marathi

टीम इंडिया बेंच स्ट्रेंथला केव्हा आजमावणार ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाला आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक देण्यात अपयश आले. आपल्यासाठी आणखी एक स्पर्धा निराशाजनक ठरली. गेल्या नोव्हेंबरपासून भारताने दोन कसोटी सामने गमावले आहेत. यापेक्षाही अधिक धक्कादायक म्हणून वर्ल्ड चॅम्पियन भारताला मागच्या 9 वनडेपैकी फक्त दोनमध्ये विजय मिळाला आहे. आफ्रिका आणि न्यूझीलंडमधील पराभवानंतर टीम इंडिया आशिया चषकात चांगली कामगिरी करेल, अशी आशा होती. बांगलादेशातील परिचित वातावरण आणि खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करून टीम इंडिया आत्मविश्वास परत मिळवेल, असेही वाटत होते. मात्र, असे घडले नाही. धोनीची अनुपस्थिती आणि काही ठिकाणी नशिबाची साथ न लाभल्याचे कारण संघाने पुढे केले. मात्र, खेळात दुखापत, नशिबासारख्या गोष्टी पचनी पडत नाहीत. सर्वश्रेष्ठ संघ प्रत्येक परिस्थितीत आपली योग्यता सिद्ध करतो. किमान संघर्ष तरी करतोच. मात्र, नंबर वनच्या थाटात मिरवणा-या भारताच्या कामगिरीत असे काहीच दिसले नाही. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

एक वर्षाने वर्ल्डकपमध्ये भारत पुन्हा एकदा मजबुतीने खेळण्यासाठी काय करता येईल, असा प्रश्न निर्माण झाला. अखेर आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत. चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझेही असेलच.प्रतिभा हा चर्चेचा विषय नाही का ?..आहे किंवा नाहीसुद्धा. फलंदाजीत आपल्याकडे बरेच मोठे नाव असलेले खेळाडू आहेत. स्फोटक फलंदाजही आहेत. मात्र, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात सुधारणेची गरज आहे. ब्रेट ली मागच्या आठवड्यात भारतात होता. ताशी 140 कि.मी. वेगाने गोलंदाजी करू शकणारे दोन ते तीन गोलंदाज नसतील तर भारताला वर्ल्डकपमध्ये संघर्ष करावा लागेल, असे त्याने म्हटले. उमेश यादव, वरुण अ‍ॅरोन व मो. शमीसारख्या काही गोलंदाजांनी वेग दाखवला आहे. निवड समिती आपले काम करीत आहे, असे आपण म्हणू शकतो. मात्र, उमेश आणि वरुणबाबत फिटनेसची समस्या कायम आहे. हे दोघे मैदानावर कमी आणि बेंचवर अधिक वेळ दिसतात. शमीची फिटनेस चांगली दिसत आहे. मात्र, त्याच्यावर वाढते ओझे चिंतेची बाब आहे. देशी प्रशिक्षक उत्तम की विदेशी? या वादात सध्या मला पडायचे नाही. दोघांचे फायदे आणि नुकसान आहेत. प्रतिभेला ओळखून त्याला संधी देणे यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. आशिया चषकात असे न केल्याने सुनील गावसकर यांनी संघ व्यवस्थापनाला फटकारले होते.

भारताने सरावाला गरजेनुसार पर्याय ठरवल्याने गावसकर नाराज होते. सलग सामने झाल्यास असे शक्य आहे. मात्र, एखादा संघ सलगपणे पराभूत होत असेल तर सराव कसा टाळता येईल, असे गावसकर यांचे म्हणणे होते. पुजारा, ईश्वर पांडेला संधी न दिल्याने त्यांनी प्रश्न निर्माण केले. विश्वचषक जवळ येत आहे. आता आपण बेंच स्ट्रेंथला आजमावणार नाही तर कधी ?.. गावसकरच नव्हे तर देशातील सर्व क्रिकेटप्रेमींसाठी हा चिंतेचा विषय आहे. बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी न देण्यामागे काही गंभीर कारण किंवा कारस्थान तर नाही ना ?.. असे काहीच नसेल अशी मी आशा करतो. असे खरोखर नाही, हे बीसीसीआयने सिद्ध केले पाहिजे.