आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Pakistan Cricket Team By Ayyaz Memon, Divya Marathi

पराभवाच्या मानसिकतेतून सावरणे पाकसाठी कठीण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा नेहमी भारताकडून पराभव का होतो? टीम इंडियाचे खेळाडू पाक खेळाडूंवर वरचढ का ठरतात? वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध पाकचा आणखी एक पराभव बघून पाकचे चाहते अचंबित झाले आहेत. पाकला या पराभवातून सावरण्यासाठी मनोवैज्ञानिक आव्हानाचा सामना करणे गरजेचे आहे. 1992 ते आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये (वनडे) पाकविरुद्ध झालेल्या आतापर्यंतच्या पाच सामन्यांत आणि टी-20 वर्ल्डकपमध्ये झालेल्या चार सामन्यांपैकी सर्व 9 लढतींत भारताचा विजय झाला. गेली 22 वर्षे वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध फ्लॉप होणे ही पाक संघ व्यवस्थापनासाठी मोठी चिंतेची बाब आहे.


पाक संघाकडे प्रतिभेची कमी नाही. मागच्या काही दिवसांपूर्वीच पाकने आशिया चषकात भारताला हरवले होते. आश्चर्य म्हणजे त्यांच्याकडून कोणत्याही मोठ्या स्पर्धेत विशेषत: वर्ल्डकपमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाते, तेव्हा नेमका पाक संघ अपयशी ठरतो. माझ्या मते, या अपयशातून सावरण्यासाठी पाक संघाने मनोवैज्ञानिक मदत घेतली पाहिजे. असे केले तरच समजेल की दबावात पाक संघ का हरतो!


फक्त पाक संघच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघालासुद्धा कोणत्याही मोठ्या स्पर्धेत विजय मिळवता आलेला नाही. यामुळेच त्यांच्या टीमवर चोकर्सचा शिक्का बसलेला आहे. वैयक्तिक कामगिरीचा विचार करायचा, तर टेनिस स्टार इवान लेंडल क्रमवारीत नंबर वन राहून जगातल्या सर्व मोठ्या स्पर्धांत विजय मिळवण्यात यश मिळवले होते. मात्र, त्याला विम्बल्डन कधीही जिंकता आले नाही. इंग्लंडचा टेनिस स्टार अँडी मरेसुद्धा प्रदीर्घ काळ मानसिक संघर्ष करत होता. नंतर त्याने फेडरर, नदाल आणि योकोविकला पराभूत करून ग्रँडस्लॅम जिंकले. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानच्या जावेद मियाँदादने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या विजयी षटकारातून सावरण्यासाठी भारतीय संघाला तब्बल पाच वर्षे लागली.


आत्ममंथन, परिश्रम, आत्मविश्वास आणि मानसिक तयारीतून यावर तोडगा निघणे शक्य आहे काय? मी या प्रश्नाचे उत्तर वाचकांवर सोडतो. वाचकच याचे खरे उत्तर देऊ शकतील. शुक्रवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा विचार केला, तर भारतीय खेळाडूंनी समर्थपणे दबावाचा सामना केला. आपल्या खेळाडूंनी चांगले स्किल आणि मजबूत इराद्याची प्रचिती दिली. गेले सहा महिने धोनी ब्रिगेडची कामगिरी सुमार होती. मात्र, पाकविरुद्ध विजयाने नवी आशा निर्माण झाली आहे. पाकविरुद्ध सामन्यात धोनीने तीन फिरकीपटूंना आजमावले. ही रणनीती यशस्वी ठरली. उजव्या हाताचा लेगस्पिनर अमित मिश्राने शानदार गोलंदाजी केली. मिश्रा प्रदीर्घ काळ प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होता. यामुळे तो निराश झाला नाही. उलट आपल्या गोलंदाजीत विविधता आणण्यासाठी त्याने मेहनत घेतली. कर्णधार धोनीला त्याच्यावर विश्वास होता, म्हणून त्याला संधी मिळाली. मिश्राने कर्णधाराला निराश केले नाही.
धोनीने सुरेश रैना आणि युवराजलासुद्धा आजमावले. रैनाने दोन्ही सराव सामने आणि पाकिस्तानविरुद्ध सामन्यात चांगली कामगिरी करून कर्णधाराचे मन जिंकले. मात्र, युवीला अजून आपली उपयुक्तता सिद्ध करायची आहे. पुढच्या वर्षी होणा-या वर्ल्डकपसाठी युवीला संघात स्थान मिळवायचे असेल, तर त्याला चांगली कामगिरी करावीच लागेल. युवीला यात यश मिळेल, कारण तो अजेय योद्धा आहे.