सचिन तेंडुलकरचे आत्मवृत्त ‘प्लेइंग इट माय वे’ देशातच नव्हे, जगभर लोकप्रिय झाले. पुस्तकाने विक्रीचा उच्चांक प्रस्थापित केला. विक्रमादित्याचे पुस्तक लोकप्रिय होणार नाही, असे कधी होईल काय? हे पुस्तक माझ्याकडेही आहे. मात्र, त्यावर मी त्याची स्वाक्षरी घेऊ शकलो नाही. कारण तो लंडनला रवाना झाला. भारत-श्रीलंका मालिका समालोचनात व्यग्र असल्यामुळे हे पुस्तक मी अजून वाचले नाही. लवकरच वाचेन. मात्र, मी अनेक पत्रकार मित्रांची समीक्षा वाचली. सचिनने सामना निश्चितीसंदर्भात अतिशय त्रोटक लिहिल्याचे वाचले. हे जर सत्य असेल, तर मी खूप निराश होईन. गत दीड दशकापूर्वी सामना निश्चितीमुळे भारतीय क्रिकेटची अपार हानी झाली. सचिनने हा पडदा उघडायला हवा होता. त्याच्याकडून ही अपेक्षा अगदीच योग्य ठरते.
क्रिकेटप्रेमी जाणतात की, सचिन, सौरव गांगुली,
राहुल द्रविड, लक्ष्मण आणि अनिल कुंबळेमुळे
टीम इंडिया सामना निश्चितीच्या सावटापासून बचावली. या मंडळींनीच भारतीय क्रिकेटला नवजीवन दिले. सचिनने मॅच फिक्सिंगवर मौन पाळले. मात्र, प्रशिक्षक ग्रेग चॅपेल (२००५-०७) यांचा आडमुठा बाणा मांडला. तो १९४ वर असताना मुलतान कसोटीत द्रविडने अनपेक्षितपणे डाव घोषित करणेही मांडले. भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंशी असलेल्या मतभेदांमुळे चॅपेल यांना डच्चू मिळाल्याचे
आपण सारे जाणतो. मात्र, द्रविडला हटवून सचिनला कर्णधार करण्याचा चॅपेल यांचा हेतू असल्याचे प्रथमच उलगडले. ते टीम इंडियात दरी पाडण्यासाठी कसे कारस्थान करत, हेही सचिनचे पुस्तक सांगते. तसे पाहिले तर जवळपास दीड दशकापासून भारतीय संघ परदेशी प्रशिक्षकांचा सहारा घेतो. अल्प काळासाठी रवी शास्त्री आणि लालचंद राजपूत यांना संधी मिळाली. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ परदेशी प्रशिक्षकांवरच विश्वास टाकत आले.
गत दीड दशकात भारताने चार परदेशी प्रशिक्षक आजमावले. गॅरी कर्स्टन (द. आफ्रिका), जॉन राइट (न्यूझीलंड), ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया) आणि डंकन फ्लेचर (झिम्बॉब्वे) अशी त्यांची नावे. यातले कर्स्टन आणि राइट पूर्णपणे यशस्वी ठरले. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने अनेक विजय मिळवले. खेळाडूंची मने जिंकण्यातही हे प्रशिक्षक यशस्वी ठरले. कर्स्टन यांच्या कार्यकाळात आपण विश्वविजेते बनलो. चॅपेल यांच्याबाबत सचिनने लिहिलेच आहे. वर्तमान प्रशिक्षक फ्लेचर यांचा कार्यकाळ अजून बाकी आहे. त्यामुळे त्यांच्यावर आताच बोलणे उचित नव्हे.
भारतीय संघासाठी परदेशी प्रशिक्षकच का? भारतीय का नको, यावर अनेक वादविवाद होतात. लिटिल मास्टर सुनील गावसकरही या मंडळींत समाविष्ट आहेत. आकड्यांचीच गोष्ट करायची झाली तरी परदेशी प्रशिक्षकांच्या नेतृत्त्वात टीम इंडियाचा यश आलेख उंचावला. (स्व.) राजसिंह डुंगरपूर एकदा मला म्हणाले होती की, ड्रेसिंग रूममध्ये त्यांनी खेळाडूंचे बोलणे ऐकले होते. या पदासाठी भारतीय प्रशिक्षक योग्य नाही, असे त्यांचे मत होते. प्रादेशिक मानसिकता आणि मोक्याच्या संघर्षसमयी भीती त्यांच्या मनात असते, असे खेळाडूंचे म्हणणे होते. डुंगरपूर यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेतली. परदेशी प्रशिक्षक जॉन राइट यांना करारबद्ध केले. दुसरी गोष्ट जरा याहून वेगळी आहे. चॅपेल यांना करारबद्ध करण्यात गांगुलीची भूमिका होती. मात्र, चॅपेल यांनी सर्वात आधी गांगुलीलाच संघाबाहेर काढले. चॅपेल यांच्यामुळे टीम इंडिया जवळपास दोन वर्षे तणावात राहिली आणि तीन वर्षे मागे गेली. हरभजन आणि जहीर खाननेही ही गोष्ट मान्य केली आहे.
परदेशी प्रशिक्षकांमुळे टीम इंडियात अनेक चढ-उतार आले. त्यामुळे सचिन, गांगुली, द्रविड किंवा लक्ष्मणपैकी एखादा भारतीय प्रशिक्षक होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, अन्यथा परदेशी प्रशिक्षकांच्या मांडवातच टीम इंडियाला यशाची पताका डौलत ठेवावी लागेल.