क्रिकेटपटूंना एका रात्रीत कोट्यधीश बनवणा-या टी-२० प्रकाराला कठोर टीकेला सामोरे जावे लागत आहे. यामुळे खेळाच्या तंत्रावर वाईट परिणाम आणि टी-२० क्रिकेट खेळ कमी आणि व्यवसायच जास्त असून त्यामुळे क्रिकेटच्या नैतिक मूल्यांचा -हास झाल्याचेही काहींचे म्हणणे आहे. माझ्या मते हे दोन्ही तर्क चुकीचे नाहीत. तंत्राबद्दल बोलायचे झाले तर अनेक खेळाडू असे आहेत, जे उत्तम कसोटीपटू होऊ शकतील. मात्र, टी-२० त चमकून ते गपगार झाले. उरलीसुरली उणीव स्पॉटफिक्सिंगने भरून काढली. टी-२०मुळे खेळाडू जरूर श्रीमंत बनले. मात्र, त्यांचे केवळ नैतिक अध:पतनच झाले नसून त्यांनी अपार माया जमा केली आहे.
वनडे क्रिकेट आले तेव्हा प्रचंड गजहब झाला होता. यामुळे कसोटी क्रिकेटला धोका निर्माण होईल, असे बोलले गेले. चार दशकांत वनडे क्रिकेटची मुळे घट्ट झाली. याची लोकप्रियता घटताच टी-२० चा जन्म झाला. वनडे असो अथवा टी-२०, कसोटी क्रिकेट संपणार नाही हेच सत्य आहे. एक मात्र खरे, या प्रकारांमुळे कसोटी क्रिकेट वेगवान झाले आहे. त्याची कलात्मक सुंदरता गायब होत चालली आहे. सामने अनिर्णीत न संपता निकाल लागत आहे. गेल्या १० वर्षांत ७० टक्के कसोटी सामन्यांचे निकाल विजय अथवा पराभव स्वरूपात लागले. सुमार तंत्रामुळे फलंदाज लवकर बाद होणे पाहवणारे नाही. टी-२० क्रिकेटला तरुणांनी डोक्यावर घेतले. या प्रकाराचा यात दोष नाही.
टी-२० मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत थरार असतो. फक्त कसोटीच खेळून कारकीर्द घडवायची खेळाडूंची इच्छा नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकारात शानदार प्रदर्शन करून नाव गाजवण्याचा त्यांचा इरादा आहे. यात चुकीचे काय? माझ्या मते, टी-२० क्रिकेटच्या फटक्यांनी या तरुण खेळाडूंवर अशी काही जादू केली की, त्यांचा संयम हरवला आहे. तीन दिवसांतच कसोटीचा निकाल लागतोय. स्पष्ट निकाल लागणे ही चांगली गोष्ट असली तरी सुमार तंत्रामुळे सामना लवकर संपला तर टीका होणारच. बहुतांश संघ ४०-५० षटकांतच सर्वबाद होतात. हे क्रिकेटसाठी चांगले नाही. सर्वच क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळत नाही. मग अशा वेळी मोजक्या वेळेत जास्त पैसे कमावले तर चुकीचे काय? असे टी-२० बाबत बोलले जाते. विंडीज, बांगलादेश, श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना त्या देशाचे क्रिकेट मंडळ भरगच्च पैसे देत नाही. ती कमाई त्यांना आयपीएल सत्रातून मिळते. टी-२० वर टीका करण्याऐवजी प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या तंत्रावर मेहनत घ्यावी. त्यांच्या चुका सुधाराव्या. टी-२० क्रिकेटमधील वाईट गोष्टी दूर सारण्यासाठी कठोर पावले उचलली जावीत, असेच चाहत्यांचे मत आहे.