आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..आता एकच ध्यास ऑलिम्पिकमध्ये सहभाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या वेळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पात्र होण्यासाठी थोडी कमीच पडले. पण आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत मात्र निश्चितपणे सहभागी होईन, असा ठाम विश्वास ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने व्यक्त केला. येथील न्यू आर्ट्स कॉर्मस अँड सायन्स महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळी ती नगरमध्ये आली होती.

महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातील विविध स्पर्धांमध्ये गौरवास्पद कामगिरी करणार्‍या खेळाडूंना तिच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. गेल्या वेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची कविताची संधी हुकली होती. त्याबाबत तिने खंत व्यक्त केली. ‘‘त्या वेळी मला तयारी करण्यासाठी अवघा काही महिन्यांचा वेळ मिळाला. शिवाय त्या वेळी आम्हाला नवे प्रशिक्षक मिळाले होते. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यातही बराच वेळ गेला. या वेळी मात्र प्रचंड आत्मविश्वास आहे आणि आतापासूनच तयारीदेखील सुरू केली आहे. त्यामुळे आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत नक्कीच सहभागी होईन,’’ असे ती म्हणाली.

नाशिकमध्ये क्रीडा क्षेत्राला पोषक वातावरण आहे, तसे नगरमध्येही असावे. एका राष्ट्रीय स्पर्धेला नगरच्या याच महाविद्यालयातील पूजा वराडे व मी सोबत होतो. आम्ही एकाच खोलीत राहिलो. आज तिला सुवर्णपदक मिळाले, याचा प्रचंड अभिमान वाटतो, अशा शब्दांत तिने पूजाचे कौतुक केले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मी खेळायला सुरुवात केली त्या वेळी मला खेळण्यासाठी उत्तम सुविधा मिळाल्या नव्हत्या. परंतु आज तशी परिस्थिती नाही. माझे प्रशिक्षक, नंतर मिळालेल्या सुविधा व जिद्दीच्या बळावर मी उत्तम कामगिरी करू शकले, असेही तिने सांगितले.