आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia Cup 2014 : India Take On Resurgent Sri Lanka News In Marathi

आशिया चषक : आज भारताला लंकेचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - आशियातील दोन बलाढ्य संघ भारत आणि श्रीलंकेत शुक्रवारी मीरपूरच्या मैदानावर क्रिकेट युद्ध रंगेल. श्रीलंकेचा संघ भन्नाट फॉर्मात असून टीम इंडियासाठी ही लढत निश्चितच सोपी ठरणार नाही. द. आफ्रिका आणि न्यूझीलंड दौर्‍यात सपाटून मार खाणार्‍या टीम इंडियाने बुधवारी दुबळ्या बांगलादेशला नमवले. मात्र, आता भारतीय संघाची खरी परीक्षा श्रीलंकेविरुद्ध होईल.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फॉर्मात असला तरीही आमच्यासाठी ही चिंतेची बाब नाही, असे श्रीलंकेचा उपकर्णधार दिनेश चांदिमलने म्हटले आहे. शुक्रवारच्या लढतीत आम्ही भारतीय फलंदाजांना स्वस्तात बाद करू, असा विश्वास चांदिमलने व्यक्त केला.

‘भारतीय संघ मजबूत आहे, यात काहीच शंका नाही. मागच्या दोन-तीन वर्षांत भारताने शानदार कामगिरी केली आहे. विराट शानदार फॉर्मात आहे. मात्र, आमच्याकडे मलिंगासारखे फलंदाज आहेत. त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. विराटसाठी आमच्याकडे खास योजना आहे. आम्ही सामन्यात रणनीतीनुसार खेळू,’ असे चांदिमलने सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटले. श्रीलंकेने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात गतचॅम्पियन पाकिस्तानला 12 धावांनी धूळ चारली. या सामन्यात मलिंगाने 5 गडी बाद केले. दुसरीकडे टीम इंडियाने बांगलादेशला 6 गड्यांनी नमवले. यामुळे दोन्ही संघात शुक्रवारचा सामना रंगतदार होण्याची आशा आहे. आमचे खेळाडू खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करीत आहेत. नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत भारताची मधली फळी दुबळी झाली आहे. गोलंदाज भारताच्या या दुबळ्या बाजूचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील, असेही त्याने म्हटले.

रोहित, धवनकडे लक्ष
गेल्या काही सामन्यांपासून भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवनला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. आता या दोघांकडून मोठ्या खेळीची आशा संघ व्यवस्थापनाला असेल.

आठ वेळा समोरासमोर
1984 मध्ये भारत आणि श्रीलंकेत पहिल्यांदा आशिया चषकात सामना झाला. यानंतर अखेरीस दोन्ही संघ 2010 फायनलमध्ये समोरासमोर होते. यात 5 विजय भारताच्या नावे आहेत. श्रीलंकेला 3 वेळा विजय मिळवले.

कोहली, रहाणेवर मदार
मधल्या फळीत टीम इंडियाची मदार विराट कोहली आणि युवा फलंदाज अजिंक्य रहाणे यांच्यावर असेल. दोघांनी स्पर्धेतील सलामी सामन्यात बांगलादेशविरुद्ध शानदार फलंदाजी केली होती.

संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, वरुण अ‍ॅरोन, रवीचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, अंबाती रायडू.

श्रीलंका : अँग्लो मॅथ्यूज (कर्णधार), दिनेश चांदिमल, सी. डिसिल्वा, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान, सुरंगा लकमल, लेसिथ मलिंगा, कुशल परेरा, अजंता मेंडिस, सेनानायके, नुवान कुलशेखरा.

(फोटो : मीरपूर येथील मैदानावर सराव करताना भारतीय संघाचा भुवनेश्वर कुमार.)