आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia Cup 2014: Malinga Clinches Thriller For Sri Lanka, Pakistan Lose By 12 Runs

श्रीलंकेची विजयी सलामी, गतविजेत्या पाकचा 12 धावांनी पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फातुल्लाह - श्रीलंका टीमने मंगळवारी गतविजेत्या पाकिस्तानला हरवून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला दमदार विजयाने सुरुवात केली. या टीमने पाकचा 12 धावांनी पराभव करून 4 गुणांची कमाई केली. आता श्रीलंकेचा स्पर्धेतील दुसरा सामना 28 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाशी होईल. तसेच गुरुवारी पाकला अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात पुनरागमनाची संधी आहे.

लाहिरू थिरिमाने (102) आणि मलिंगा (5/52) यांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर श्रीलंकेने सलामी सामन्यात विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 6 बाद 296 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकने रोमहर्षक लढतीत 48.5 षटकांत अवघ्या 284 धावांवर गाशा गुंडाळला. या वेळी कर्णधार मिसबाहने केलेली 73 धावांची खेळी व्यर्थ ठरली.

धावांचा पाठलाग करणार्‍या पाकला सार्जिल खान (26), अहमद शाहजाद (28) यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यापाठोपाठ मोहंमद हाफिजने 18, मकसूदने 17 धावांचे योगदान दिले. दरम्यान, उमर अकमल आणि मिसबाहने पाचव्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. मात्र, या टीमला विजयाचे लक्ष्य गाठता आले नाही.

तत्पूर्वी, थिरिमानेच्या करिअरमधील दुसर्‍या वन डे शतकाच्या बळावर श्रीलंकेने मजबूत धावसंख्या उभी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या श्रीलंकेच्या सलामीवीर थिरिमानेने 110 चेंडूंचा सामना करताना 11 चौकारांसह दोन षटकार ठोकून सर्वाधिक 102 धावा काढल्या. संगकाराने 67 आणि कर्णधार अ‍ॅँग्लो मॅथ्युजने नाबाद 55 धावांची खेळी केली. कुशल परेरा 14 धावा काढून तंबूत परतला. संगकाराने थिरिमानेसोबत दुसर्‍या गड्यासाठी 161 धावांची भागीदारी केली. गोलंदाजीत शाहिद आफ्रिदीने दहा षटकांत 56 धावा देत दोन विकेट घेतल्या. उमर गुलने दोन गडी बाद केले. तसेच सईद अजमलने एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : 6 बाद 296 धावा, पाकिस्तान : सर्वबाद 284 धावा

जयवर्धनेचा 600 वा सामना
श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज महेला जयवर्धनेने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 600 वा सामना खेळला. सर्वाधिक सामने खेळणारा जयवर्धनेने हा जगातील दुसरा फलंदाज ठरला. यात 143 कसोटी, 408 वनडे आणि 49 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. भारताचा सचिन 664 वनडेसह अव्वलस्थानी आहे.