मीरपूर - अत्यंत रोमांचक सामन्यात शाहिदी आफ्रिदी (नाबाद 34) आणि मो. हफिजच्या (75) अर्धशतकाच्या बळावर पाकिस्तानने टीम इंडियावर एका गड्याने मात केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 245 धावा काढल्या. प्रत्युत्तरात पाकने 49.4 षटकांत 9 बाद 249 धावा काढून बाजी मारली.
अखेरचे रोमांचक षटक
अखेरच्या षटकात पाकला 6 चेंडूंत विजयासाठी 10 धावांची गरज होती. पाकच्या हाती दोन विकेट होत्या. अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनने सईद अजमलला त्रिफळाचीत केले. पाकला विजयासाठी 10 तर भारताला एका विकेटची गरज होती. दुसर्या चेंडूवर जुनैद खानने एक धाव काढून स्ट्राइक आफ्रिदीकडे दिली. आफ्रिदीने पुढच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकून पाकला रोमांचक विजय मिळवून दिला.
धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून मो. हफिजने 75, आफ्रिदीने 34, शोएब मकसूदने 38 आणि अहमद शहजादने 42 धावांचे योगदान दिले. भारताकडून अश्विनने 3, अमित मिश्रा आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, रोहित शर्मा (56), अंबाती रायडू (58) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 52) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने 50 षटकांत 5 बाद 245 धावा काढल्या. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन अवघ्या 10 धावा काढून मो. हाफिजचा बळी ठरला. कोहली 5 धावा काढून बाद झाला. रोहितने 58 चेंडूंत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 56 धावा काढल्या. मागच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहितने अर्धशतक ठोकले.
रायडू, जडेजाची अर्धशतके
अजिंक्य रहाणेने 23 धावा काढल्या. यानंतर अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक यांनी 52 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. कार्तिक 23 धावांवर बाद झाला. रायडूने 62 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 4 चौकारांसह 58 धावा काढल्या. रवींद्र जडेजाने 49 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 52 धावा काढल्या.
धावफलक
भारत धावा चेंडू 4 6
रोहित झे. हफिज गो. तल्हा 56 58 7 2
धवन पायचीत गो. हाफिज 10 13 2 0
कोहली झे. अकमल गो गुल 05 11 0 0
रहाणे झे. हफिज गो. तज्हा 23 50 3 0
रायडू झे. बदली गो. अजमल 58 62 4 1
कार्तिक झे. अजमल गो. हाफिज 23 46 1 0
रवींद्र जडेजा नाबाद 52 49 4 2
अश्विन यष्टिचीत गो. अजमल 09 07 2 0
शमी झे. मकसूद गो. अजमल 00 03 0 0
अमित मिश्रा नाबाद 01 01 0 0
अवांतर : 8. एकूण : 50 षटकांत 8 बाद 245 धावा. गोलंदाजी : मो. हफिज 9-0-38-2, उमर गुल 9-0-60-1, जुनैद खान 7-0-44-0, आफ्रिदी 8-0-38-0, मो. तल्हा 7-1-22-2, अजमल 10-0-40-3.
पाकिस्तान धावा चेंडू 4 6
शाजिर्ल खान त्रि. गो. अश्विन 25 30 3 1
शहजाद झे. अश्विन गो. मिश्रा 42 44 6 0
हफिज झे. भुवन गो. अश्विन 75 117 3 2
मिसबाह धावबाद 01 04 0 0
उमर झे. जडेजा गो. मिश्रा 04 17 0 0
मकसूद धावबाद 38 53 2 1
शाहिद आफ्रिदी नाबाद 34 18 2 3
गुल झे. रहाणे गो. भुवनेश्वर 12 12 0 1
तल्हा झे. जडेजा गो. भुवनेश्वर 00 01 0 0
अजमल त्रि. गो. अश्विन 00 01 0 0
जुनैद खान नाबाद 01 01 0 0
अवांतर : 17. एकूण : 49.4 षटकांत 249 धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार 10-0-56-2, मो. शमी 10-0-49-0, रवीचंद्रन अश्विन 9.4-0-44-3, रवींद्र जडेजा 10-1-61-0, अमित मिश्रा 10-0-28-2. सामनावीर : मोहम्मद हफिज
गोलंदाजी ठरली वरचढ
पाकिस्तान संघाच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय पाकिस्तानी गोलंदाजांनी सार्थकी ठरवत भारताच्या सलामीच्या फलंदाजीला सुरुंग लावण्याचे कार्य केले. मोहम्मद हाफिज 2, उमर गुल 1, मोहम्मद ताल्हा 2 आणि सइद अजमल 3 खेळाडूंना बाद केले.