आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia Cup News In Marathi, Srilanka Versus Bangladesh Match, Mirpur

आशिया कप : श्रीलंकेचा विजयी चौकार; बांगलादेशचा दारुण पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रीलंका संघाने गुरुवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत ‘विजयी’ चौकार ठोकला. या संघाने यजमान बांगलादेशला घरच्या मैदानावर 3 गड्यांनी पराभूत केले. यासह श्रीलंकेने स्पर्धेत सलग चौथ्या विजयाची नोंद केली.


कर्णधार मॅथ्यूजच्या नाबाद 74 धावांच्या बळावर श्रीलंकेने सामना जिंकला. यापूर्वीच सलग तिसरा विजय मिळवून श्रीलंकेने अंतिम फेरी गाठली आहे. आता शनिवारी फायनलमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान संघ समोरासमोर असतील.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 9 बाद 204 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 49 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठून चौथा विजय साजरा केला. नाबाद अर्धशतक झळकवणारा मॅथ्यूज सामनावीरचा मानकरी ठरला.
तत्पूर्वी बांगलादेशला अनामुल (49) आणि शमसूर रहमान (39) यांनी 74 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. नासेर हुसेन (30), महमुद्दाल्लाह (30), शाकीब (20) यांनीही चांगली खेळी केली. गोलंदाजीत श्रीलंकेच्या लकमल, परेरा, मेंडिस आणि प्रियरंजनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.


मॅथ्यूज-डिसिल्वाची अर्धशतकी भागीदारी
धावांचा पाठलाग करणार्‍या श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर परेरा भोपळा न फोडता तंबूत परतला. त्यापाठोपाठ संगकारा (2) आणि जयवर्धने (0) झटपट बाद झाले. मॅथ्यूज आणि डिसिल्वा यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला.


संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : 9 बाद 204, श्रीलंका : 7 बाद 208