आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Atheletics Competation Ingurated, Today Game Starts

रंगारंग सोहळ्यात आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे थाटात उद्घाटन, खेळाडूंची झुंज आजपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - डोळ्याचे पारणे फेडणारी आतषबाजी, रंगारंग कार्यक्रम आणि हजारो भारतीय चाहत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला थाटात प्रारंभ झाला. हवेत तिरंगी फुगे सोडल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास रंगलेल्या या सोहळ्यात धनगरी, आदिवासी, बिहू, गरबा नृत्याने रंगत आणली. बॉलीवूड नृत्याला प्रेक्षकांनी जल्लोषात दाद दिली, अप्रतिम अशा गणेशवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. सुमारे पाच हजार प्रेक्षकांनी हा कार्यक्रम याचि देही याचि डोळा अनुभवला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, मोहिनी लांडे आदींची उपस्थिती होती.


नवे क्रीडा धोरण क्रांतिकारक
नवे क्रीडा धोरण खेळाडूंसाठी क्रांतिकारक ठरणार असून, यातील तरतुदींमध्ये खेळाडूंच्या विकासाचा पूर्ण विचार केला असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्रातील खेळाडू जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करतील. इतर राज्यांच्या तुलनेत खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा देण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे, असे ते म्हणाले. स्पर्धेच्या तयारीबाबत कौतुक करताना ते म्हणाले की, चेन्नईतील स्पर्धा ऐनवेळी महाराष्ट्रात आयोजित करण्यास सांगितल्यानंतरही अवघ्या तीस दिवसांत स्पर्धेची तयारी पूर्ण करण्यात आली. या वेळी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अदिल सुमारीवाला, आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव मॉरिस निकोलस यांची भाषणे झाली. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी प्रास्ताविक केले.


भारतीय खेळाडूंकडे लक्ष
ऑलिम्पिकपटू कृष्णा पुनिया, गत स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मायोखा जॉनी, गुआंगझौमध्ये सुवर्णपदक मिळवणारी प्रिजा श्रीधरन यांच्याकडून पदकाची जबरदस्त आशा आहे. पुण्यातील बालेवाडीमध्ये बुधवारी सकाळी 9 वाजता 20 व्या राष्ट्रीय आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ होईल. भारताच्या महिला खेळाडू भरात असून, त्यांच्याकडून पहिल्याच दिवशी सुवर्ण कामगिरीची आशा आहे. सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतची वारसदार मोनिका आथरे प्रथमच आशियाई स्पर्धेत सहभागी झाली असून, तिच्या कामगिरीकडेही क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेले आहे. स्पर्धा रोज रात्री आठपर्यंत सुरू राहील.


ओम प्रकाशला संधी
बालेवाडीत बुधवारी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी सुरू होणा-या गोळाफेक स्पर्धेत भारताच्या ओम प्रकाशला पदकाची संधी आहे. त्याने 20.69 मीटरची वैयक्तिक कामगिरी नोंदवली आहे. मात्र, त्याच्यासमोर तैवानच्या मिंग हुआंग चँगचे जबरदस्त आव्हान असेल. मिंगने मोसमात 19.89 मीटरची कामगिरी केली आहे.


कृष्णा पुनिया सरावात अपयशी : वॉर्मअप सत्रात मंगळवारी कृष्णा पुनियाने जोरदार सराव केला. मात्र, तिला अपेक्षित कामगिरी साधता आलेली नाही.


बुधवारच्या स्पर्धा
सकाळी 9 वाजता : 100 मीटर (पुरुष) डेकॅथलॉन 1
9.20 वाजता : 400 मी. धावणे (महिला)
9.40 वाजता : लांब उडी : पुरुष गट : डेकॅथलॉन 2
9.50 वाजता : 400 मी. धावणे : पुरुष गट
11.00 वाजता : गोळाफेक : पुरुष गट : डेकॅथलॉन 3
5.00 वाजता : 100 मीटर धावणे : पुरुष गट, उंच उडी : पोलव्हॉल्ट फायनल
5.10 वाजता : गोळाफेक : पुरुष गट, अंतिम फेरी
5.15 : थाळीफेक : महिला गट : अंंतिम फेरी
5.35 : 100 मीटर धावणे : महिला गट
6.00 : 400 मीटर : पुरुष गट : उपांत्य फेरी, लांब उडी : महिला फायनल
6.25 : 400 मीटर : महिला गट : उपांत्य फेरी
6.50 : 10 हजार मीटर धावणे : महिला गट, अंतिम फेरी
7.30 : 400 मीटर : पुरुष गट : डेकॅथलॉन 5


कृष्णा पुनिया भारतीय ध्वजधारक
स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी 45 देशांच्या संघांचे पथसंचलन झाले. 92 खेळाडूंचे जम्बो पथक असलेल्या भारतीय संघापाठोपाठ चीन, पाकिस्तानच्या पथसंचलनाला प्रेक्षकांनी जल्लोषात दाद दिली. भारतीय संघाच्या पथसंचलनाच्या अग्रभागी कृष्णा पुनिया ध्वजधारक होती, तर धावपटू प्रिजा श्रीधरन हिने खेळाडूंना शपथ दिली. या वेळी मान्यवरांची उपस्थिती होती.