आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Atheletics : India Get Double Dhamaka By Omprakash, Mayookha

आशियाई अ‍ॅथेलेटिक्स स्‍पर्धा: ओमप्रकाश, मायुखाकडून भारताला डबल धमाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सकाळ सत्रातील निराशाजनक कामगिरीने भारताचे संपूर्ण लक्ष ओमप्रकाश आणि कृष्णा पुनियाच्या कामगिरीकडे लागले होते. सव्वीसवर्षीय 6 फूट 7 इंच उंचापु-या ओमप्रकोशनेही प्रेक्षकांना निराश केले नाही. त्याने 19.45 मीटर गोळा फेकत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.


सौदी अरेबियाचा अल्हेब्शी सुलतान अब्दुल याने 19.68 मीटरची सुवर्ण कामगिरी केली. चायनीज तैपेईचा चँग मिंग हुआंग याने (19.61 मीटर) रौप्यपदक मिळवले. ओमप्रकाशमुळे नंतर भारतीय माना अभिमानाने उंचावल्या.


कृष्णाचे पदक हुकले
महिलांच्या थाळीफेक प्रकारात भारताची आशास्थान असलेली कृष्णा पुनियाकडून बुधवारी घोर निराशा झाली. दुखापतीने त्रस्त असलेल्या कृष्णाला अपेक्षित कामगिरी साधता न आल्याने तिचे पदक हुकले. तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसतानाही भारताची ऑलिम्पिकपटू मागे पडली. तिने 55.01 मीटर थाळीफेक केली, ज्यामुळे ती चौथ्या स्थानावर फेकली गेली. यात चिनी खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. चीनच्या सू झिन्यूने 55.88 मीटरची कामगिरी नोंदवत सुवर्णपदक मिळवले, तर तिचीच देशभगिनी जियांग फेजिंग (55.70 मीटर) हिने रौप्य, तर तैपेईची ली सई-यी (55.32) हिने कांस्यपदक मिळवले.


10 हजार मीटरमध्येही निराशा
आशियाई स्पर्धेत 10 हजार मीटर प्रकारात प्रिजा श्रीधरनवर प्रचंड आशा होत्या. मात्र, ती चौथ्या स्थानावर राहिल्याने भारताचे हुकमी आशास्थानही हुकले. बहरीनची शिताये हाबतेगेब्रल हिने 32 मिनिटे 17.29 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक, तर सौदी अरेबियाच्या अलिया मोहंमद सईद (32-39.39) हिने रौप्यपदक, तर जपानच्या अयुमी हागिवारा (32:47.44) हिने कांस्यपदक मिळवत रेस संपवली. एकूण 7 फे-यांमध्ये 10 हजार मीटरच्या या शर्यतीत प्रिजाने चौथ्या फेरीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. मात्र, जपानच्या अयुमीने तिला शेवटपर्यंत पुढे जाण्याची संधी दिली नाही. थाळीफेक आणि 10 हजार मीटर या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये चौथ्या स्थानावर भारताला समाधान मानावे लागले आहे.


राष्ट्रीय विक्रम सरस
ओमप्रकाशच्या नावावर 20.69 मीटरचा राष्ट्रीय विक्रम आहे. आशियाई स्पर्धेत या विक्रमाशीही बरोबरी नाही. ओमप्रकाशचा राष्ट्रीय विक्रमच आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यापेक्षा सरस आहे. ओमप्रकाशने किमान 20 मीटरचीही कामगिरी नोंदवली असती तरी त्याच्या नावावर बुधवारी सुवर्णाक्षराने नोंदला गेला असता.


मायुखाने जिंकली मने
स्पर्धेचा पहिला दिवस संपत असतानाच मायुखा जॉनीने लांब उडीत कांस्यपदक जिंकल्याचा जल्लोष सुरू झाला. थाळीफेकमध्ये कृष्णा पुनियाकडून निराशा झाल्यानंतर महिलांमध्ये लांब उडीत मायुखा एकमेव भारताचे आशास्थान होते. मायुखाचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. जपानच्या सचिको मासुमी हिने 6.55 मीटरची सुवर्ण कामगिरी केली.