आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Athelitics Competation: Vikas Gauda Get Gold Medal

विकास गौडाची सोनेरी कामगिरी; थाळीफेकमध्ये भारताला पहिले सुवर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील बालेवाडी येथे गुरुवारी भारतीय खेळाडूंनी 20 व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवत सुवर्णपदकासह तीन पदकांची लयलूट केली. थाळीफेकमध्ये विकास गौडाने भारताला पहिले सुवर्ण, तर 400 मीटर स्पर्धेत पुवम्मा एम. आर. ने रौप्यवान कामगिरी केली. 10 हजार मीटर पुरुष गटात रतिराम सैनी याने कांस्यपदक मिळवले. विकासने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. शुक्रवारी तो तिशीत पदार्पण करेल.

भारताने एकाच दिवसात सुवर्ण, रौप्य, कांस्यपदकाची लयलूट करताना भारताच्या पदकांची संख्या पाचपर्यंत नेऊन ठेवली आहे. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेचा अनुभव पाठीशी असलेल्या विकासने लौकिकास साजेशी कामगिरी केली.


पुवम्माचे सुवर्ण हुकले
जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा निर्धार करणा-या पुवम्माची वेगवान सुरुवातच पदकाच्या दिशेने सुरू झाली. 400 मीटरची ही शर्यत सायंकाळी सुरू झाली, तेव्हा प्रेक्षकांनी पुवम्माला चिअरअप करण्यास सुरुवात केली. मात्र, चीनची झाओ यान्मीन हिने पुवम्माला पुढे जाण्याची संधी दिली नाही. झाओने ही शर्यत 52.49 सेकंदांनी जिंकत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले, तर पुवम्माने 53.377 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यवान कामगिरी केली. पुवम्माच्या यशाने दुस-या दिवशी भारताची कांस्यपदकाची कोंडी फुटली. लेबनॉनच्या तस्लिकियान ग्रेटा हिने कांस्यपदक मिळवले.

रतिरामचा दस का दम
क्षमतेची कसोटी पाहणारी 10 हजार मीटर शर्यतीत रतिराम सैनीने भारताला गुरुवारी तिसरे कांस्यपदक मिळवून दिले. प्रचंड घामाने डबडबलेल्या या स्पर्धेत भारताचे कांस्यपदक नक्की होते. कारण रतिरामच्या मागेही भारताचाच खेताराम धावत होता. रतिरामने 29 मिनिटे 35.42 सेकंदांची वेळ नोंदवली. या स्पर्धेत बहरीनचे निर्विवाद वर्चस्व राहिले. सुवर्ण व रौप्य ही दोन्ही पदके त्यांच्याच खेळाडूंनी खिशात घातली. अलेमू बेकेले गेब्रे याने 28 मिनिटे 47.26 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्ण, तर बिलिसुमा जेलास याने 28 मिनिटे 58.67 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. रतिरामच्या मागे धावत असलेल्या खेतारामने 29 मिनिटे 35.72 सेकंदांची वेळ नोंदवत चौथा क्रमांक मिळवला. पदक मिळवल्यानंतर रतिराम म्हणाला की, यापुढे आणखी कामगिरी करीन. सध्या माझा बंगळुरू येथे सराव सुरू असून जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्याचा निर्धारही त्याने या वेळी व्यक्त केला.

1500 मीटरमध्ये संदीपकडून आशा
स्पर्धेच्या दुस-या दिवशी भारताच्या संदीप करण सिंगने पदकाच्या आशा कायम ठेवल्या असून 1500 मीटरच्या दुस-या हिटमध्ये दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली. त्याने बहरीनच्या राशीद रामझीला मागे टाकले, ज्याच्या नावावर आशियाई विक्रम आहे. अर्थात, पहिले चार खेळाडू 1500 मीटरच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. राशीदला संदीपच्या पुढे जाण्याची संधी असली तरी त्याने तिस-या क्रमांकावरच समाधान मानले. अंतिम फेरी शुक्रवारी सायंकाळी 6.20 वाजता होणार आहे. यात भारताच्या संदीपसिंगसह कतारचा मोहंमद अलगार्नी, बहरीनचा बिलाल मन्सूर अली, राशीद रामझी, पॅलेस्टाइनचा अमास्त्री वासेम याने अंतिम फेरी गाठली.

सिद्धांतकडून अडथळा पार
पुरुष गटातील 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतही भारताला पदकाच्या आशा असून सिद्धांत थिंगलया याने तिस-या हिटमध्ये चीनच्या खेळाडूला मागे टाकले. त्याच्यासह चीन, थायलंड, जपान, कुवेत, इराकच्या खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली. तिस-या हिटमध्ये धावताना सिद्धांतने 13:8:5 सेकंद इतकी वेळ नोंदवली. त्याला चीनच्या जियांग फॅनने कडवी झुंज दिली. जियांगने 13:8:6 सेकंदांची नोंद केली. महिलांच्या पहिल्या हिटमध्ये भारताची गायत्री जी. अपयशी ठरली. ती चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. पहिल्या दोन खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.

सू बिंग्तियान 100 मीटरचा राजा
स्पर्धेतील सर्वांत औत्सुक्याची ठरलेल्या 100 मीटर स्पर्धेत चीननेच हुकुमत गाजवली. पुरुषांमध्ये चीनचा सू बिंग्तियान, तर महिलांमध्ये चीनची वेई योंगली वेगवान ठरले. बिंग्तियानने 10.17 सेकंद, तर वेई योंगलीने 11.29 सेकंदांची वेळ नोंदवली.

विकास गौडाची सुवर्ण थाळी
रौप्यपदकाचा आनंद विरतो ना विरतो तोच विकासच्या सुवर्ण कामगिरीचा जल्लोष सुरू झाला. थाळीफेकमध्ये अनुभवी विकासने लौकिकास साजेशी कामगिरी करताना 64.90 मीटर थाळीफेक केली. पहिल्या फेरीत त्याला 60 मीटरच्या आतच थाळी पडल्याने तो काहीसा निराश झाला होता. मात्र, दुस-या फेरीत त्याला सूर सापडला आणि 60 मीटरच्या पुढे थाळी भिरकावत त्याने सोनेरी यशाला गवसणी घातली. इराणच्या मोहंमद सामिमीने (60.82) रौप्य, तर कतारच्या अहमद मोहंमद धी याने(60.82) कांस्यपदक मिळवले.

दिमित्रीची आघाडी
पोलव्हॉल्टमध्ये कझाकिस्तानच्या दिमित्री कारपोव्हने निर्विवाद वर्चस्व राखले. 110 मीटर हर्डल्समध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर पोलव्हॉल्टमध्येही कमाल केली. 5 मीटरच्या उंचीवरील बांबू उडीत तो एकमेव आघाडीवर होता. त्याने 5.10 मीटर उंचीची उडी घेतल्यानंतर त्याच्या जवळपास एकही खेळाडू नव्हता. दिलीपकुमार के. याने भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्याने 4.20 मीटर उंची गाठली. नंतर तो अपयशी ठरला. दिमित्रीने 5.10 मीटरची उडी घेत डेकॅथलॉनमध्ये 8,725 गुणांपर्यंत मजल मारली.

परिश्रमामुळे यश
काहीसे प्रेशर माझ्यावर होतेच. मात्र, कठीण परिश्रमामुळे मी सुवर्णपदकाला गवसणी घालू शकलो. खूपच टफ स्पर्धा होती. आता जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी पॅरिसमध्ये प्रशिक्षण घेणार आहे.
-विकास गौडा, थाळीफेकपटू.

सराव चांगला झाला
मला पदकाची अपेक्षा होतीच. मात्र, ते रौप्य किंवा सुवर्णच असेल याची अपेक्षा केली नव्हती. दोन वर्षांपासून माझा चांगला सराव झाल्यानेच कामगिरीत सुधारणा झाली. आता माझे पुढचे लक्ष्य जागतिक स्पर्धेत यश मिळवण्याचे आहे.
पुवम्मा एम. आर, 400 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर.


पदकतालिका
देश सुवर्ण रौप्य कांस्य
चीन 7 1 1
जपान 1 2 2
बहरीन 2 2 0
कझाकिस्तान 2 0 1
उझबेकिस्तान 1 2 0
भारत 1 1 3
इराण 0 1 0
कतार 0 1 1
लेबनॉन 0 0 1
ओमान 0 0 1
तैपेई 0 1 1
कोरिया 0 0 1