इंचियोन - भारतीय महिला फुटबॉल संघाने धडाकेबाज विजयासह रविवारी आशियाई चॅम्पियनशिपमधील
आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. बेमबेम देवीच्या नेतृत्वाखाली महिला संघाने स्पर्धेतील सलामी सामन्यात मालदीव संघाचा धुव्वा उडवला. फिफाच्या जागतिक क्रमवारीत ५० व्या स्थानी असलेल्या भारतीय महिला संघाने १५-० ने एकतर्फी विजय संपादन केला.
माेठ्या फरकाने मिळवलेल्या विजयाच्या बळावर भारताने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आशियाई स्पर्धेच्या उद्घाटन साेहळ्याच्या आठवड्यापूर्वीच फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. अ गटातील भारताने गुणतािलकेत तीन गुणांसह आघाडी घेतली.
विंगर सस्मिता मलिक आणि मिडफील्डर कमलादेवी यांनी केलेल्या प्रत्येकी पाच गोलच्या बळावर भारतीय महिला संघाने सामना जिंकला. याशिवाय भारताच्या विजयात एन. बालादेवीने दाेन, आशालता, बेमबेमदेवी आणि परमेश्वरीने प्रत्येकी एका गोलचे याेगदान दिले.
मध्यंतरापूर्वी ९-० ने आघाडी
भारतीय महिला संघाने पाचव्या मिनिटाला सामन्यात गोलचे खाते उघडले. सस्मिता मलिकने भारताकडून हे यश संपादन केले. त्यानंतर तिने २१ व्या मिनिटाला दुसरा गोल करून संघाच्या आघाडीला २-० ने मजबूत केले. त्यापाठाेपाठ अवघ्या दाेन मिनिटांत मिडफील्डर कमला देवीने (२३ मि.) भारताकडून तिसऱ्या गोलची नाेंद केली. सस्मिताने २६ व्या मिनिटाला भारताकडून चाैथा गोल केला. तसेच कमलादेवीने ३१ व्या मिनिटाला मालदीवविरुद्ध गोल केला. त्यामुळेच भारताला मध्यंतरापूर्वी लढतीत ९-० ने आघाडी घेता आली. त्यानंतर बेमबेम, परमेश्वरी व आशालताने प्रत्येकी एक गोल केला.
बुधवारी काेरियाचे आव्हान
भारतीय महिला संघासमाेर बुधवारी उपांत्यपूर्व लढतीत दक्षणि काेरियाचे तगडे आव्हान असेल. भारताने सलामी सामना जिंकून स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे आता भारताला काेरियाविरुद्धही उल्लेखनीय कामगिरी करावी लागणार आहे.
१५-० ने भारताने मिळवला एकतर्फी विजय
०५ गोल केले सस्मिता, कमलाने
भारत-यूएई आज रंगणार लढत
पुरुष गटात भारत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्यात फुटबाॅलचा सामना रंगणार आहे. यूएईविरुद्ध लढतीतून भारतीय संघाला आशियाई स्पर्धेतील आपल्या जेतेपदाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याची संधी आहे. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाला प्री-क्वार्टरमधील आपला प्रवेश नशि्चित करण्याची संधी आहे.