आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Games News In Marathi, Divya Marathi, Sport

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एशियन गेम्स: भारताला २८ वर्षांनंतर कांस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - भारतीय खेळाडूंनी १७ व्या आशियाई स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवताना दुस-या दिवशी रविवारी दोन कांस्यपदकांची कमाई केली. ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सायना नेहवालने शानदार विजयासह भारताला बॅडमिंटनच्या सांघिक गटात २८ वर्षांनंतर कांस्यपदक मिळवून दिले. तसेच सुवर्णपदक विजेत्या जितू रॉयच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष नेमबाजी संघाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
सायनाची झुंज; सिंधू अपयशी
आशियाई स्पर्धेच्या बॅडमिंटनमध्ये लंडन ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालने रविवारी यजमान दक्षिण कोरियाविरुद्ध उपांत्य लढतीत एकाकी झुंज दिला. सायनाने ५६ मिनिटांत कोरियाच्या सुंग जिहानचा २१-१२, १०-२१,२१-९ अशा फरकाने पराभव केला. दुसरीकडे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सिंधूला सपशेल अपयशाला सामोरे जावे लागले. याचाच फायदा घेत यजमानांच्या महिला संघाने उपांत्य सामना ३-१ अशा फरकाने जिंकून फायनलमधील प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे पराभवामुळे भारताच्या महिला संघाला आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारताला १९८६ नंतर कांस्यपदक
यापूर्वी भारताच्या पुरुष संघाने १९८६ मधील आशियाई स्पर्धेच्या बॅडमिंटनमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. यंदाच्या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सांघिक गटात कांस्यपदकावर नाव कोरले.

कोरियाच्या बाई येनजुने भारताच्या सिंधूला २१-१४, १८-२१, २१-१३ अशा फरकाने धुळ चारली. या वेळी सिंधूने दुस-या गेममध्ये बाजी मारून पुनरागमन केले होते. मात्र, त्यानंतर तिचा तिस-या निर्णायक गेममध्ये फार काळ निभाव लागला नाही. तसेच कोरियाच्या किम सोयेंग व चांग यानाने महिला दुहेरीच्या लढतीत भारताच्या प्रज्ञा गद्रे आणि एन. सिक्की रेड्डीचा २१-१६, २१-१७ ने पराभूत केले. तसेच पी.सी. तुलसीला किमने २१-१२, २१-१८ ने हरवले.
स्क्वॅश : दीपिकाचे पदक निश्चित
जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असलेल्या दीपिका पल्लिकल आणि आशियातील नंबर वन साैरभ घाेषालने स्क्वॅशमध्ये भारतीय संघाचे आशियाई स्पर्धेतील पदक निश्चित केले. दीपिकाने महिला एकेरीतील आपले पदक पक्के केले. तिने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत आपली सहकारी जोश्ना चिनप्पाचा पराभव केला. दीपिकाने ७-११, ११-९, ११-८, १५-१७, ११-९ अशा फरकाने सामना जिंकला. याशिवाय तिने अवघ्या ५८ मिनिटांत स्पर्धेतील पदक निश्चित केले. जोश्नाने पहिल्या गेममध्ये बाजी मारून आघाडी मिळवली होती. मात्र, त्यानंतर दीपिकाने दमदार पुनरागमन केले. तिने आक्रमक खेळी करत दुसरा व तिसरा गेम जिंकून लढतीत आघाडी घेतली. त्यानंतर चौथा गेम जिंकून जोश्नाने लढतीत बराेबरी साधली होती. मात्र, दीपिकाने पाचव्या निर्णायक गेममध्ये बाजी मारून सामना आपल्या नावे केला.

सौरभ घोषालला तिस-यांदा पदक
भारताच्या नंबर वन सौरभने पुरुष एकेरीत सलग तिस-यांदा आपले पदक निश्चित केले. त्याने उपांत्यपूर्व सामन्यात पाकच्या इक्बाल नसीरला धूळ चारली. त्याने ११-६, ९-११, ११-२, ११-९ ने विजय मिळवला. दुसरा गेम गमावल्यानंतर सौरभने अवघ्या आठ मिनिटांत तिसरा गेम जिंकून लढतीत आघाडी घेतली हाेती.
श्रीलंकेविरुद्ध भारताचा एकतर्फी विजय
हॉकी : रूपिंदरपाल सिंगची हॅट्ट्रीक
आठ वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियन भारतीय हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत आपल्या मोहिमेला दमदार विजयाने सुरुवात केली. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने रविवारी स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजयाची नोंद केली. भारताने ८-० ने सामना जिंकून स्पर्धेत मोठ्या फरकाने धडाकेबाज विजयाची नोंद केली. आता भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना मंगळवारी ओमानशी होईल.

रूपिंदरपाल सिंगने (१२, ४५, ४६ मि.) गोलची हॅट्ट्रीक करून ब गटात भारताला विजय मिळवून दिला. रमणदीपने (२८, ५९ मि.) दोन, दानिश मुज्तबा (६ मि.), रघुनाथ (१३ मि.) व चिंगलसेनाने यांनी प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले.

भारतीय महिलांसमोर आज थायलंड
हाॅकीच्या महिला गटात सोमवारी भारताचा सामना थायलंडशी होईल. या सामन्यातून िरतू राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ आशियाई स्पर्धेत आपल्या विजयी मोहिमेला सुरुवात करेल. वंदना कटारियासह िरतू राणी, राणी रामपालसारख्या युवा खेळाडू चमकदार कामगिरीसाठी उत्सुक आहेत.