आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Sport Compatation: India Realy Team Touch With Gold

आशियाई क्रीडा स्पर्धा: भारतीय रिले संघाचा सुवर्ण सांगता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील बालेवाडीमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची भारतीय रिले संघाने सुवर्ण सांगता केली. अखेरच्या पाचव्या दिवशी सुवर्णपदकासह 3 रौप्य, 4 कांस्यपदकांसह एकूण 8 पदके मिळवली. महिला रिले संघाने 4 बाय 400 मीटर रिलेत सुवर्ण, आशा रॉयने 200 मीटरमध्ये, रणजित माहेश्वरीने रौप्य, जिथीन थॉमसने उंच उडीत रौप्य तर सतिंदरसिंगने 400 मीटर हर्डल्समध्ये, अर्पिंदरसिंगने तिहेरी उडीत, टिंटू लुकाने 800 मीटरमध्ये, दुती चाँदने 200 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. भारताने 200 मीटर व तिहेरी उडीत पदकांचा डबल धमाका करत सर्वोत्तम कामगिरी केली.


सतिंदरने केली पदकांची सुरुवात
आशियाई भारताच्या सतिंदरसिंग याने 400 मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक जिंकून देत स्पर्धेचा पाचवा दिवस गाजवला. शनिवारी रिकाम्या हाताने तंबूत परतणा-या भारताचा पाचवा दिवस सतिंदरच्या कांस्यपदकाने सुरू झाला. त्याने 50.35 सेकंदांची वेळ नोंदवली. फिनिश लाइनला स्पर्श करत असतानाच कझाकिस्तानच्या खेळाडूने त्याला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतिंदरनने काही सेकंदांच्या फरकाने त्याला मागे टाकत कांस्यपदकावर नाव कोरले. जपानच्या यासुहिरो फुएकी याने 49.86 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. चीनचा चेंंग वेंग (50.07 से.) याने रौप्यपदक मिळविले. मात्र, महिला गटात भारताच्या पदरी निराशा पडली. भारताची आर. एलावरासी ही 6 खेळाडूंमध्ये तळाच्या स्थानी राहिली. यातही जपाननेच वर्चस्व राखत सातोमी कुबोकुरा (56.82) हिने सुवर्ण, तर याच देशाची मानामी किरा (57.78) हिने रौप्य, तर जो इयुन-जूने (58.21 से) कांस्य मिळविले.


महिलांचा 200 मीटरमध्ये डबल धमाका : भारताच्या महिलांनी 200 मीटरमध्ये डबल धमाका करीत रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. आशा रॉयने 23.62 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्य, तर दुती चाँद हिने 23.82 सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळविले. कझाकिस्तानच्या व्हिक्टोरिया झ्याबकिना हिने सुवर्णपदकावर नाव कोरताना 23.62 सेकंदांची वेळ नोंदवली. आशाने दुस-या क्रमांकावर धावत असताना दुतीला मात्र इराणच्या मरियम तुसीच्या कडव्या आव्हानास सामोरे जावे लागले.


4 बाय 400 मीटर महिला रिलेत सुवर्ण
200 मीटर : रौप्य : आशा रॉय :
कांस्य : दुती चाँद : 23.82 सेकंद
तिहेरी उडी : रौप्य : रणजित माहेश्वरी
कांस्यपदक : अर्पिंदर सिंग
800 मीटर हर्डल्स कांस्य : सतिंदर


800 मी.मध्ये टिंटू लुकाला कांस्य
पी.टी. उषाची वारसदार टिंटू लुकाने महिलांच्या 800 मीटरमध्ये कांस्यपदक मिळवत भारताला पाचव्या दिवशी चौथे पदक मिळवून दिले. सुरुवातीपासून प्रथम क्रमांकावर धावणारी टिंटू अखेरच्या 50 मीटरमध्ये तिस-या स्थानावर फेकली गेली. चीनची वँँग चुन्यू हिने जोरदार मुसंडी मारत सुवर्र्णपदक मिळवले. तिने 2 मिनिटे 2.47 सेकंदांची नोंद केली.बहारीनच्या रेगासा गेंझेब शुमी (2:4.16) हिने रौप्य, तर भारताच्या टिंटू लुकानने 2:4.48 मिनिटांची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळविले. मात्र, याच प्रकारात पुरुष गटात भारत पदकापासून वंचित राहिला.


पुरुषांच्या रिले संघाकडून निराशा
महिलांच्या यशाचा आनंद एकीकडे साजरा होत असताना भारतीय पुरुषांच्या रिले संघाने मात्र निराशा केली. त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.


तिहेरी उडीत दुहेरी आनंद
तिहेरी उडीत भारतीय खेळाडूंनी दोन पदके मिळवत भारताला दुहेरी आनंद दिला. रणजित माहेश्वरी आणि अर्पिंदरसिंगने ही कामगिरी केली असून, रणजितने रौप्यपदक मिळविताना 16.76 मीटरची नोंद केली, तर अर्पिंदर सिंगने 16.58 मीटरची नोंद करताना कांस्यपदक मिळविले.


महिला रिलेचा आठवावा प्रताप!
4 बाय 400 मीटर रिलेमध्ये भारतीय महिला संघाने आशियाई स्पर्धेतील आठवे सुवर्णपदक जिंकताना भारतीयांची मने जिंकली. अमानमध्ये 2009 मध्ये झालेल्या अशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेनंतर भारताने सुवर्णपदक रिलेतील हुकूमत पुन्हा एकदा सिद्ध केली. जेव्हा अखेरच्या भारतीय खेळाडूने फिनिश लाइन पूर्ण केली तेव्हा तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडू 25 मीटरपेक्षाही मागे होत्या. स्पर्धेतील हे एकमेव निर्विवाद वर्चस्व राखलेले यश आहे. संघाचा विजयोत्सव ढोल-ताशांच्या गजरात साजरा करताना सुमारे तीन हजार प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.


भारताला ‘जम्प ऑफ’ वर मिळाले रौप्यपदक
उंच उडीत पहिल्या तिन्ही खेळाडूंना समान 2.21 मीटर उडी घेतल्याने जम्प ऑफ नियमावर क्रम निश्चित करण्यात आला, त्यात भारताच्या जिथीन थॉमस व इराणच्या किवान घनबार्झादेह यांना संयुक्त रौप्यपदक बहाल करण्यात आले, तर चीनचा बी. झायोलियांग याने सुवर्णपदक पटकावले.

रंगतदार समारोप
‘अप्सरा आली...’, ‘मला जाऊ द्या ना घरी’ या ठसकेबाज लावणीवर अभिनेत्री पूजा सावंतचे धडाकेबाज नृत्य, तामिळनाडूचे प्रसिद्ध ‘मारी अम्मा मारी अम्मा...’वरील लोकनृत्याबरोबरच ‘निंबुडा निंबुडा’, ‘ढोली तारो ढोल बाजे’वरील नृत्याला भरभरून दाद देत प्रेक्षकांनी स्टेडियम डोक्यावर घेतले होते. इंडियन आयडॉल राहुल सक्सेनानेही ‘खेळ मांडला’चे गीत सादर करीत 20 व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या समारोपाला चार चाँद लावले. महिनाभरापासून राबणारा कर्मचारी वर्ग समारोपाच्या या रंगारंग कार्र्यक्रमाने सगळा थकवा विसरला होता, तर प्रेक्षकांनी शिट्ट्यांनी मैदान दणाणून सोडले.


पदकतालिका
देश सुवर्ण रौप्य कांस्य
चीन 15 6 5
बहरीन 5 7 3
जपान 4 6 10
सौदी अरेबिया 4 2 1
उझबेकिस्तान 3 4 1
भारत 2 5 9