चेन्नई - भारताचा एकेरीतील नंबर वन खेळाडू सोमदेव देववर्मनला शुक्रवारी एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य लढतीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. भारताचा युवा खेळाडू युकी भांबरीने सोमदेवला पराभूत केले. त्याने सरळ दोन सेटमध्ये 6-2, 6-4 अशा फरकाने विजय मिळवला.यासाठी त्याला एक तास 41 मिनिटे झुंज द्यावी लागली. या रोमांचक लढतीतील विजयासह युकीने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत 174 व्या स्थानी असलेल्या युकीने पहिल्या सेटमध्ये दमदार सुरुवात केली. त्याने 6-2 ने पहिला सेट जिंकून आघाडी मिळवली. दरम्यान, सोमदेवने प्रतिस्पर्धी युकीची तीन वेळा सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर पुनरागमन करताना युकीनेही बलाढ्य खेळाडूची चार वेळा सर्व्हिस मोडून काढली. यासह त्याने उपांत्य सामना आपल्या नावे केला.
अलेक्झांडर-युकी सामना
आता युकीचा सामना रशियाच्या बिगरमानांकित अलेक्झांडरशी होईल. रशियाच्या या खेळाडूने नुकतेच उपांत्य सामन्यात दुस-या मानांकित एवजेनी डोस्कोयला पराभूत केले. त्याने 7-6, 6-3 ने विजय मिळवला. आता त्याला युकीच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.
० एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धा
० सरळ दोन सेटमध्ये सोमदेवचा अनपेक्षित पराभव
० युकीने 101 मिनिटांत जिंकला सामना
युकी तिस-यांदा फायनलमध्ये
भारताचा स्टार युवा खेळाडू युकी भांबरीने तिस-यांदा चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. यापूर्वी त्याने गतवर्षी ऑस्ट्रेलियाच्या ट्रारालगन आणि तैवान येथील स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.