आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रीडा समिती’साठी स्थायी समितीचे सभापती अनुकूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शासनाचा अध्यादेश असताना गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडा समितीशिवाय मनपाच्या क्रीडा विभागाचे काम सुरू आहे. याप्रकरणी ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर अनेक नगरसेवक आणि विविध जिल्हा क्रीडा संघटकांनी क्रीडा समितीची मागणी केली. आता मनपा स्थायी समितीचे सभापती विकास जैन यांनीसुद्धा क्रीडा समिती स्थापनेसाठी अनुकूलता दर्शवली आहे.
‘शासनाच्या आदेशानुसार मनपामध्ये क्रीडा समिती स्थापन व्हायला हवी. गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या दुर्लक्षामुळे समिती अस्तित्वात आली नाही. या समितीमुळे मनपातील खेळाडूंचा व शहरात खेळाचा विकास होईल यात शंका नाही. त्यामुळे आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू,’ असे जैन यांनी या वेळी नमूद केले.

महानगरपालिकेचे प्रशासन उदासीन
पाच वर्षांपूर्वी नगरसेवक दत्ता पाथ्रीकर यांच्या पुढाकाराने सर्व क्रीडा संघटकांची तत्कालीन बैठक घेण्यात आली. शहरात विविध ठिकाणी सामाजिक सभागृहात क्रीडा प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. याप्रकरणी प्रशासनाने चालढकल केल्याने प्रस्ताव रेंगाळला. यावरून मनपा प्रशासन खेळाबाबत किती उदासीन आहे हे दिसून येते. स्पर्धेदरम्यान खर्चामध्ये पारदर्शकता राहत नाही. ती समिती स्थापन केल्याने येईल.
प्रा. फुलचंद सलामपुरे, कुस्ती संघटक

ठाणे महापालिकेचा आदर्श समोर ठेवावा
औरंगाबाद मनपाने ठाणे मनपाचा आदर्श घ्यावा. ते क्रीडा समितीअंतर्गत स्वत:ची प्रबोधिनी स्थापन करून गरीब खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. औरंगाबाद मनपाला एकही खेळाडू घडवता आला नाही ही शरमेची बाब आहे.
गोविंद शर्मा, सचिव, जिल्हा खो-खो संघटना

मनपा खेळाडूंना प्रोत्साहनाची गरज
मनपा शाळेतील सर्वसाधारण व गरीब कुटुंबातील मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. मानसिक व शारीरिक ताकद, आत्मविश्वास त्यांच्याकडे असल्याने ते उत्कृष्ट खेळाडू ठरतील. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा समिती आवश्यक आहे.
नीरज बोरसे, सचिव, तायक्वांदो संघटना