औरंगाबाद - एडीसीए मैदानावर झालेल्या व्हेरॉक क्रिकेट स्पध्रेच्या फायनलमध्ये शहर पोलिसने मसिआवर 54 धावांनी मात करत विजेतपद पटकावले. शुभम जाधवने (71) शानदार अर्धशतक झळकावले. शहर पोलिसचा मो. इम्रान सामनावीर ठरला.
प्रथम फलंदाजी करताना सिटी पोलिसने 20 षटकांत 4 बाद 154 धावा काढल्या. सलामीवीर शुभम हरकळने 42 आणि युवा क्रिकेटपटू शुभम जाधवने 71 धावांची खेळी केली. जाधवने 50 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकार खेचले. हरकळने 38 चेंडूत 42 धावा ठोकल्या. मो. इम्रानने 16 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार लगावत नाबाद 23 धावा कुटल्या. शेख बाबर 15 धावांवर नाबाद राहिला. मसिआच्या सैद जावेदने 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात मसिआच्या सलमीवीर शेख मुकीमने 37 चेंडूंत सर्वाधिक 37 धावा काढल्या. मुधर पटेल (14), सैद जावेद (18) आणि संदीप चाटे (14) मोठी खेळी करू शकले नाहीत. इतर फलंदाजांनी निराशा केली. पोलिसच्या मो. इम्रानने तिखट मारा करत 3.4 षटकांत 15 धावा देत 4 गडी बाद केले. गिरिजानंद भगतने 2 विकेट घेतल्या.
विजेत्या शहर पोलिस संघासह बजाजचे डी. व्ही. रंगनाथन, व्हेरॉकचे संचालक तरंग जैन, उपाध्यक्ष एम. पी. शर्मा, एडीसीए सचिव सचिन मुळे, कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील, हेमंत मिरखेलकर.
स्वप्निलला दुचाकी भेट
विजेत्या संघाला बजाज ऑटोचे उपाध्यक्ष डी. व्ही. रंगनाथन व व्हेरॉकचे संचालक तरंग जैन यांच्या हस्ते 75 हजारांचे रोख बक्षीस देण्यात आले. उपविजेत्या संघाला 51 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले असून मालिकावीर ठरलेल्या स्वप्निल चव्हाणला मान्यवरांच्या हस्ते दुचाकी भेट देण्यात आली. समारोपप्रसंगी व्हेरॉकचे उपाध्यक्ष एम. पी. शर्मा, एडीसीचे सचिव सचिन मुळे, कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील, स्पर्धा आयुक्त हेमंत मिरखेलकर यांची उपस्थिती होती.
उत्कृष्ट खेळाडू
0मालिकावीर - स्वप्निल चव्हाण, सामनावीर - मो. इम्रान, फलंदाज - शेख मुकीम, गोलंदाज गिरिजानंद भगत. स्पर्धेतील विशेष
0स्पर्धेत 16 संघांमध्ये एकूण 33 सामने खेळवले गेले. गोलंदाजांनी एकूण 376 बळी घेतले आणि फलंदाजांनी 7150 धावांचा पाऊस पाडला. तसेच 495 षटकारांची आतषबाजीही स्पर्धेत झाली.