आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत कदम, मारिया कराचीवाला ठरले वेगवान धावपटू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध क्रीडा प्रकारात मुंबई, ठाणे संघाच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. 14 वर्षांखालील 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत मुलांमध्ये ठाण्याच्या सुशांत कदम आणि मुलींच्या गटात मुंबईच्या मारिया कराचीवालाने सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेत 26 जिल्ह्यांच्या एकूण 1453 खेळाडूंनी
सहभाग नोंदवला.
विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 100 मीटरमध्ये सुशांतने 11.07 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. मुंबईच्या साहिब गुरविंदर सिंगलाने 11.08 सेकंदांसह दुसरे स्थान गाठले. सातार्‍याच्या आकाश लोखंडेला (12.00 से.) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
10 वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक प्रकारात धुळ्याच्या अग्रता मालकवडेने 5.09 मीटर लांब गोळा फेक करून प्रथम क्रमांक पटकावला. धुळेच्याच श्रेजा एस.ने 4.76 मीटरसह दुसरा क्रमांक आणि मुंबईच्या ईशा मुंदडाने 4.19 मीटरसह कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

स्पर्धेचे थाटात उद्घाटन
स्पर्धेचे उद्घाटन स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांच्यासह प्रल्हाद सावंत, वीजेंद्र सिंग, अ‍ॅड. किरण दंताळ, सूर्यमाला मालती, डीएसओ ऊर्मिला मोराळे यांची उपस्थिती होती.
आजचा निकाल : गोळाफेक 10 वर्षे मुले : विशाल शेलार (प्रथम), सागर सिंग (द्वितीय), दर्श शहा (तृतीय). मुली : अग्रता मालकवडे, श्रेजा एस., इशा मुंदडा. लांब उडी मुली : श्रुती माने, महेक शहा, हिमानी खैरे.

औरंगाबादच्या राशीला कांस्य
मुलींच्या 14 वर्षांखालील 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत यजमान संघाच्या राशी जाखोटेने कांस्यपदक मिळवले. तिने 13.06 सेकंदांची वेळ घेत ही शर्यत पूर्ण केली. यापूर्वी तिने अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांत पदके पटकावलेली आहेत.