आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुलाला पाच वर्षांत घरघर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद- कोट्यवधी रुपये खर्च करून गारखेडा परिसरात उभ्या असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे देखभाल दुरुस्ती आणि अपुर्‍या सुरक्षेअभावी घरघर लागली आहे. संकुलातील भव्य अँथलेटिक्स ट्रॅक नावालाच आहे. या ठिकाणी खेळाच्या सुविधाही पुरेशा नाहीत.

मुख्य स्टेडियममध्ये फुटबॉलच्या मैदानाच्या बाजूला अँथलेटिक्सचा 400 मीटरचा मातीचा ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. या ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यावर सिमेंटचे मोठे ढापे टाकण्यात आले. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या दुर्लक्षामुळे जवळपास दीडशे ते दोनशे मीटरच्या अंतरातील ढापे तोडून यातील लोखंड चोरट्यांनी लांबवले. या ढाप्याच्या सिमेंटचे तुकडे नाल्यात टाकल्याने नालेच बंद पडले आहेत. धक्कादायक म्हणजे याच परिसरात कार्यरत असलेल्या क्रीडा उपसंचालक कार्यालयातील एकाही अधिकारी, कर्मचार्‍याचे या चोरीकडे अद्याप लक्ष गेलेले नाही.

मातीचा ट्रॅक खेळाडूंसाठी ठरतोय धोकादायक
नियमांना डावलून तयार करण्यात आलेला मातीचा ट्रॅक धोकादायक बनला आहे. ट्रॅकवरील माती पाण्याने वाहून गेल्याने ट्रॅक खडकाळ झाला असून, अनेक ठिकाणी मातीऐवजी विटा, दगडांनी जागा घेतली आहे. फुटबॉलच्या मैदानाचीही बिकट अवस्था झाली आहे. मैदानावरील हिरवळ नष्ट झाली असून, जागोजागी माती, दगड लागते. यामुळे खेळाडूंना इजा होण्याची शक्यता आहे. मैदान हिरवेगार ठेवण्यासाठी संकुल समितीकडून पाणी उपलब्ध असूनही पाण्याचा उपयोगच होत नाही. परिसरातच कार्यरत असलेले क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात.

स्टेडियमची दुर्दशा; सुविधांचा अभाव
शहरातील शेकडो खेळाडू, क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू, विविध शाळांचे विद्यार्थी याच मैदानावर विविध खेळ खेळतात. अनेक जण येथे मार्निंग वॉकही करतात. यासाठी शासनाकडून शुल्कही आकारले जाते. मात्र, शासनाकडून त्यांना सुविधा देण्याच्या नावाने बोंबाबोंब आहे. लांब उडीच्या जागेत सी सँडऐवजी बांधकामात वापरली जाणारी काळी वाळू टाकण्यात आलेली आहे. यामुळे खेळाडूंना गंभीर इजा होण्याचा धोका आहे. फुटबॉलच्या मैदानाचीही नीट निगराणी होत नाही. प्रेक्षक गॅलरीमधील लोखंडी रॉडदेखील तुटले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पिंपळाची झाडे उगवली असल्याने स्टेडियमच्या पिलरला धोका निर्माण झाला आहे. मैदानाच्या आवारातच फटाक्यांचा कचरा, मुरूम, सिमेंट, काचेचे तुकडे पडून असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे.

मला अद्याप माहिती नाही
स्टेडियममधील ढापे चोरी गेले आहेत की नाही, हे मला अद्याप माहिती नाही. मैदानाची पाहणी करावी लागेल आणि त्यानंतरच मला काही तरी सांगता येईल. - चंद्रकांत कांबळे, क्रीडा उपसंचालक