आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशिष्ट खेळाडूंसाठी पुन्हा निवड चाचणी? आंतरमहाविद्यालयीन कुस्ती चाचणी वादाच्या भोवर्‍यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - क्रीडा विभागाकडून आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुस्ती संघ जाहीर झालेला असताना पुन्हा एकदा कुस्ती निवड चाचणी 23 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. असे असले तरीही काही कुस्तीपटूंनी निवेदनाद्वारे पुन्हा होणार्‍या निवड चाचणीला आक्षेप घेतला आहे. विद्यापीठाच्या कुस्ती संघात जालन्याचे अधिकाधिक खेळाडू सामील करता यावेत, यासाठी ही चाचणी पुन्हा होत असल्याचा आरोप काही खेळाडूंनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
गेल्या 22 व 23 नोव्हेंबर रोजी आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा भारत बीपीएड महाविद्यालय, जालना येथे घेण्यात आली. विशेष म्हणजे विद्यापीठ क्रीडा विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. भक्त या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांनी स्वत: या स्पर्धेचे आयोजन केले होते. नियमानुसार या स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्या खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली. या विजेत्या कुस्तीपटूंचे शिबिर गेल्या 16 डिसेंबरपासून विद्यापीठात सुरू आहे. या शिबिरात आतापर्यंत खेळाडूंना कुस्तीचे नव्हे तर फक्त फिटनेसचे धडे देण्यात आले आहेत. मॅटवर खेळाडूंचा सरावही देण्यात आला नाही. येत्या 26 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान मेरठ येथे आंतरविद्यापीठ स्पर्धा होणार आहे.


चांगल्या निकालासाठी हा प्रयत्न
सराव शिबिरामध्ये पुन्हा निवड चाचणी घेऊन विद्यापीठाचा संघ पाठवणे असा कोणताही लिखित नियम नाही, परंतु आपल्या विद्यापीठाचा निकाल चांगला लागावा आणि भरपूर पदके मिळावीत यासाठी ही चाचणी घेण्यात येत आहे. चालू वर्षी सर्व स्पर्धांत सराव शिबिरामध्ये चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाचा निकालही चांगला लागला आहे. त्याचे खेळाडूंनी समर्थन करायला हवे.
डॉ. दयानंद भक्त, प्रभारी क्रीडा विभागप्रमुख

2010 मध्येही कुस्ती संघावर अन्याय : 2010 मध्ये हरियाणात झालेल्या आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुरुष व महिला संघाला हाकलण्यात आले होते. तत्कालीन संघ प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या केलेल्या हेराफेरीमुळे संपूर्ण संघाला त्याचा फटका बसला होता.