आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद महापालिकेचा क्रीडा समितीला ‘खो’!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चांगले खेळाडू घडवून युवकांचा विकास साधला जाऊ शकतो. आरोग्यासाठी खेळ आणि प्रगत शहरासाठी गुणवंत खेळाडूंची जडणघडण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, मनपाला याचे सोयरसुतक नाही. क्रीडा समिती स्थापन करण्याचा राज्य शासनाचा अध्यादेश असताना औरंगाबाद पालिकेने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मनपांतर्गत शहरातील खेळाडूंचे अतोनात नुकसान होत आहे.


क्रीडा समितीबाबत प्रशासन अज्ञानी महानगरपालिकेत जेथे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तेथे खेळाडूंचे प्रश्न सुटणार तरी कसे? शासनाचा आदेश असताना मनपामध्ये क्रीडा समिती असते हेदेखील गेल्या आठ वर्षांपासून औरंगाबाद मनपा प्रशासनाला माहिती नव्हते. दै ‘दिव्य मराठी’ ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. या विषयावर नगरसेवक पंकज भारसाखळे यांनी पाठपुरावा करून सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडला, त्याला मंजुरीही मिळाली होती.

भापकरांनी फेटाळला प्रस्ताव - क्रीडा समितीचा प्रस्ताव दाखल करताना क्रीडा विभागाने पूर्ण अभ्यास न केल्याने मोठी अडचण झाली. आता या समितीच्या स्थापनेसाठी नियमांचा अडथळा येत आहे. तत्कालीन मनपा आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी नियमांचा बडगा पुढे करीत क्रीडा समितीचा प्रस्ताव नोव्हेंबर 2012 मध्ये फेटाळला. क्रीडा समिती स्थापनेसाठी पुन्हा प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र, याकडे नगरसेवकांसह सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

शहरातील मैदानेही दुर्लक्षित - मनपाची गरवारे क्रीडा संकुल तसेच हडकोतील क्रीडा संकुलासह अनेक छोटी-छोटी मैदाने आहेत. जवळपाच सर्वच मैदाने दुर्लक्षित आहेत. गरवारे संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटनचे कोर्ट पूर्णपणे उखडले आहे. मैदानही नीट नाही. इतर सुविधा स्टेडियमवर नाहीत. हडकोतील संकुलाची अवस्थाही फार चांगली नाही. क्रीडा समितीमुळे परिस्थिती बदलू शकेल.

जेथे सामान्यांचेच प्रश्न सुटत नाहीत, तेथे खेळाडूंचे प्रश्न सुटणार कसे? खेळाडूंचा विकास करणे, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, क्रीडा शिबिरे आदी कामे क्रीडा समिती स्थापन करूनच करावे, असा राज्य शासनाचा अध्यादेश आहे. मात्र, अनेक वर्षांपासून आजपर्यंत औरंगाबाद मनपाने क्रीडा समिती स्थापन केलेली नाही. क्रीडा समिती अभावी मनपातर्फे घेण्यात येणाºया क्रीडा स्पर्धेचे योग्य नियोजन होत नसल्याने खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इतकेच काय मनपाकडे स्वत:चे क्रिकेट मैदान, बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव असताना मनपाच्या शाळेत आतापर्यंत एकही जिल्हास्तरीय खेळाडूही घडू शकला नाही.