आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदाल, फेडरर, क्लिस्टर्स, वोज्नियाकी तिस-या फेरीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - जागतिक क्रमवारीतील नंबर दोनचा खेळाडू स्पेनचा राफेल नदाल, महिला गटातील अव्वल मानांकित डेन्मार्कची कॅरोलिन वोज्नियाकी, पाचवी मानांकित चीनची ली ना आणि गतचॅम्पियन बेल्जियमची किम क्लिस्टर्स यांनी शानदार खेळी करताना येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला आहे. स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू रॉजर फेडररला पुढे चाल मिळाल्याने त्याने सहजपणे पुढच्या तिस-या फेरीत प्रवेश केला.
नदालने जर्मनीच्या टॉमी हासला एक तास 29 मिनिटे चाललेल्या लढतीत 6-4, 6-3, 6-4 ने पराभूत केले. यादरम्यान स्पेनच्या खेळाडूने विरोधी खेळाडूच्या 38 चुका आणि चार डबल फॉल्टचा फायदा घेतला. नदालला सामन्यात एकवेळसुद्धा तगडे आव्हान मिळाले नाही. त्याने सहजपणे खेळ करताना पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. दुसरीकडे फेडररला जर्मनीच्या आंद्रेस बेक याच्यावर पुढे चाल मिळाली. दुस-या फेरीत एकही गेम न खेळता त्याने तिस-या फेरीत प्रवेश केला.
पुरुष गटात धक्कादायक निकाल-
पुरुष गटात आज धक्कादायक निकालाची नोंद झाली. आठवा मानांकित अमेरिकेच्या मार्डी फिशला कोलंबियाच्या बिगरमानांकित अ‍ॅलेक्झांड्रा फाला याच्याकडून धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. सलग सेटमध्ये पराभूत होऊन फिश स्पर्धेबाहेर गेला. फालाने फिशला 7-6, 6-3, 7-6 ने पराभूत केले. फालाने आपल्यापेक्षा अधिक क्रमवारी असलेल्या फिशला पहिल्या आणि तिस-या सेटमध्ये जोरदार झुंज दिली. जबरदस्त रोमांचानंतर फालाने दोन्ही सेटसह सामन्यात बाजी मारली. दुस-या सेटमध्ये त्याने सहजपणे विजय मिळवला.
बेर्डिक, डेल पोत्रोही पुढच्या फेरीत-
पुरुषांच्या इतर सामन्यांत सातवा मानांकित चेक गणराज्याचा टॉमस बेर्डिक, माजी यूएस ओपन चॅम्पियन अर्जेंटिना जुआन मार्टिन डेल पोत्रो, 18 वा मानांकित स्पेनचा फेलिसियानो लोपेज आणि 30 वा मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन यांनीही तिस-या फेरीत यशस्विरीत्या प्रवेश केला.

महिला गटातील दुस-या फेरीचे निकाल
किम क्लिस्टर्स (बेल्जियम) वि. वि. स्टेफिनी फोर्ज (फ्रान्स)6-0, 6-1
ली ना (चीन) वि. वि. ओलिविया रुकोवस्का (ऑस्ट्रेलिया) 6-2, 6-2
व्हिक्टोरिया अझारेंका (बेलारुस) वि. वि. सी. डेलेक्वा (ऑस्ट्रेलिया) 6-1, 6-0
कॅरोलिन वोज्नियाकी (डेन्मार्क) वि. वि. अ‍ॅना टेटिसविली (जॉर्जिया) 6-1, 7-6.

भूपती-बोपन्ना, पेस-स्टेपानेक दुस-या फेरीत
भारताचे आघाडीचे दुहेरीतील तज्ज्ञ खेळाडू महेश भूपती आणि रोहन बोपन्ना जोडी तसेच लिएंडर पेस-चेक गणराज्याचा रादेक स्टेपानेक या जोड्यांनी शानदार कामगिरी करताना आपापले सामने जिंकून दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. चौथी मानांकित जोडी भूपती-बोपन्ना यांनी पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जोडीला नमवले. दुसरीकडे पेस-स्टेपानेक यांनी यजमान देशाच्या खेळाडूंना पराभूत करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. भूपती-बोपन्ना यांनी एक तास आणि 43 मिनिटे चाललेल्या लढतीत एक सेट गमावल्यानंतरही मॅथ्यू अ‍ॅब्डेन आणि क्रिस गुकिवन यांना तीन सेटमध्ये 5-7, 6-4, 6-4 ने पराभूत केले. यादरम्यान भारतीय जोडीने विरोधी खेळाडूंच्या 23 विनरच्या तुलनेत 44 विनर मारले. पहिल्या सेटमध्ये भूपती-बोपन्ना यांना चार चुकांचा फटका बसला. मात्र, दुस-या सेटमध्ये आपल्या दमदार खेळीच्या बळावर या जोडीने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. यानंतर त्यांनी विरोधी खेळाडूंना पुढे येण्याची संधी दिली नाही. चेन्नई ओपनचा दुहेरीचा विजेता पेस येथे स्टेपानेकसोबत नव्याने जोडी बनविली. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग जोन्स आणि जॉन पॅट्रिक स्मिथ जोडीला एक तास आणि 13 मिनिटे चाललेल्या लढतीत 6-2, 6-2 ने पराभूत केले.