आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Beat India By 106 Runs, Warner And Maxwell Complete Century

कांगारूंची भारतावर १०६ धावांनी मात; वॉर्नर, मॅक्सवेलची शतके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - विश्वचषकासाठी आपली तयारी तपासण्यासाठी मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला रविवारी यजमान ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात १०६ धावांनी पराभूत करीत मोठा विजय मिळवला. सामन्यात भारतीय गोलंदाजांची अत्यंत निर्दयीपणे धुलाई झाली. नंतर फलंदाजांनीही नेहमीप्रमाणे गुडघे टेकले. भारताचा संपूर्ण डाव ४५.१ षटकांत आटोपला. भारताला पूर्ण ५० षटके सुद्धा खेळता आली नाही. टीम इंडियाच्या सहा फलंदाजांना तर दोनअंकी धावसंख्या सुद्धा गाठता आली नाही.

गेल्या अडीच महिन्यांपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यावर आहे. मात्र, भारताला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. यामुळे विश्वचषकासाठी धोनी ब्रिगेडच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विश्वचषकाच्या सहा दिवस आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने तब्बल ८ गोलंदाज आजमावले. मात्र, एकालाही कांगारूंना रोखता आले नाही.

वॉर्नर, मॅक्सवेलने बदडले
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि नंतर मधल्या फळीत मॅक्सवेलने दे दणादण बदडले. वॉर्नरने तर अवघ्या ८० चेंडूंत शतक साजरे केले, तर मॅक्सवेलने अवघ्या ५२ चेंडूंत १०० धावा काढल्या. वॉर्नर १०४ धावा काढून बाद झाला. अॅरोन फिंचने २०, शेन वॉटसनने २२ तर कर्णधार बेलीने ४४ धावांचे योगदान दिले. मॅक्सवेल १२२ धावा काढून निवृत्त झाला. त्याने ५७ चेंडूंत ११ चौकार आणि तब्बल ८ षटकारांचा पाऊस पाडला.

भारताचा डाव २६५ धावांत आटोपला
टीम इंडियाचा डाव ४५.१ षटकांत २६५ धावांत आटोपला. आनंदाची बाब म्हणजे शिखर धवन (७१ चेंडू, ५९ धावा) फॉर्मात परतला असून त्याने अर्धशतक काढले. अजिंक्य रहाणे (५२ चेंडू, ६६ धावा) आणि अंबाती रायडू (४२ चेंडू, ५३ धावा) यांनी सुद्धा अर्धशतके ठोकली.. रोहित शर्मा (८), कोहली (१८), रैना (९), धोनी (०), बिन्नी (५), जडेजा (२०) हे अपयशी ठरले.