आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्नरच्या शतकाने कांगारू विजयी, सलामी सामन्यात इंग्लंडवर तीन गड्यांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - यजमान ऑस्ट्रेलिया संघाने तिरंगी मालिकेतील आपल्या किताबाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली यजमानांनी शुक्रवारी इंग्लंडवर ३ गड्यांनी मात केली. यासह ऑस्ट्रेलियाने शानदार विजयी सलामी दिली. आता रविवारी ऑस्ट्रेलियाचा मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाशी होईल.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ४७.५ षटकांत २३४ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान ऑस्ट्रेलियाने ७ गड्यांच्या मोबदल्यात ३९.५ षटकांत लक्ष्य गाठले. मिशेल स्टार्कची (४/४२) धारदार गोलंदाजी आणि वॉर्नरच्या (१२७) तुफानी फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.

धावांचा पाठलाग करणा-या ऑस्ट्रेलियाला वॉर्नर आणि अॅरोन फिंचने दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, इंग्लंडच्या वोक्सने ही जोडी फोडली. त्याने फिंचला (१५) त्रिफळाचीत केले. त्यानंतर शेन वॉटसन १६ धावा काढून तंबूत परतला. त्याचे मोठ्या खेळीचे स्वप्न भंगले. जॉर्डनने १२.४ षटकांत वॉटसनला झेलबाद करून दुसरा बळी मिळवून दिला.

वॉर्नर-स्मिथची अर्धशतकी भागीदारी : चौथ्या क्रमांकावर आलेल्या स्मिथने दोन बाद ७१ धावा अशा संकटात असलेल्या कांगारूंचा डाव सावरला. त्याने डेव्हिड वॉर्नरसोबत तिस-या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी केली. यासह त्याने धावसंख्येचा आलेख उंचावला. दरम्यान, मोईन अलीने स्मिथला बाद केले. या वेळी स्मिथने ४७ चेंडूंचा सामना करताना दोन चौकार आणि एका षटकारासह ३७ धावांची खेळी केली. यासह तो तंबुत परतला.

मोर्गनचे शतक : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या इंग्लंडची निराशाजनक सुरुवात झाली. बेल व टेलर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मोर्गनने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने १२१ धावांची खेळी केली. मात्र, त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही. मोर्गनने १३६ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकार ठोकले. मोर्गन वगळता इंग्लंडचे दिग्गज फलंदाज सपशेल अपयशी ठरले. रवी बोपारा (१३), बटलर (२८), वोक्स (८), जॉर्डन (१७) झटपट बाद झाले.

भारत-ऑस्ट्रेलिया रविवारी समोरासमोर
तिरंगी मालिकेला दमदार विजयाने सुरुवात करणा-या ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना रविवारी होणार आहे. या वेळी यजमान संघाला सामन्यात भारताच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. या वेळी दुस-या सामन्यात बाजी मारून मालिकेत आघाडी घेण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे भारतीय संघ नव्या जाेमाने या सामन्यात उतरणार आहे.

स्टार्कची धारदार गाेलंदाजी
ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि जेम्स फ्युकनर यांनी धारदार गोलंदाजी केली. स्टार्कने ८.५ षटकांत ४२ धावा देत चार गडी बाद केले. त्याने इयान बेल (०), टेलर (०), मोर्गन (१२१) आणि फिन (०) यांना बाद केले. त्यापाठोपाठ फ्युकनरने दहा षटकांत ४७ धावा देत तीन विकेट घेतल्या.

वोक्सचे चार बळी
इंग्लंडकडून क्रिस वोक्सनेही धारदार गोलंदाजी केली. त्याने आठ षटकांत ४० धावा देत चार विकेट घेतल्या. या एक निर्धाव षटक आहे. मात्र, त्याला पराभव टाळता आला नाही. जॉर्डन व अलीने प्रत्येकी एकी विकेट घेतली.

वाॅर्नरचा दणका
127 धावा
115 चेंडू
18 चौकार
110.43 स्ट्राइक रेट

ऑस्ट्रेलियाकडून फॉर्मात असलेल्या डेव्हिड वॉर्नरने इंग्लंडच्या सुमार गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. यासह त्याने सामन्यात शानदार शतक साजरे केले. त्याने ११५ चेंडूंत १२७ धावा काढल्या. यात १८ चौकारांचा समावेश आहे.
पुढे वाचा धावफलक