आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला कांगारू वरचढ, रोहितच्या शतकानंतरही पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - तिरंगी मालिकेत टीम इंडियाला विजयी प्रारंभ करण्यात अपयश आले. भारताने रोहित शर्माच्या (१३८) शतकाच्या मदतीने २६७ धावा काढल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने अॅरोन फिंचच्या (९६) खेळीच्या बळावर हा सामना जिंकला. सहा गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

स्टार्क मॅन ऑफ द मॅच ठरला. आता भारताचा पुढचा सामना मंगळवारी इंग्लंडसोबत होईल.
ऑस्ट्रेलियाने रविवारी आपल्या दुस-या सामन्यात भारताला ४ विकेटने हरवले. भारताने एमसीजीवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर रोहित शर्माने कारकीर्दीतील सहावे वनडे शतक ठोकले. मात्र, भारताच्या आघाडी फळीचे अव्वल तीन फलंदाज शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली लवकर बाद झाले. टीम इंडिया ३ बाद ५९ धावा अशी संकटात सापडली होती. दुस-या टोकाने रोहितने शतकी खेळी करीत डाव सावरला.
ऑस्ट्रेलियाने मालिकेतील दुस-या सामन्यात भारताला नमवले. मागच्या सामन्यात यजमानांनी इंग्लंडला ४ विकेटने नमवले होते. त्या सामन्यात सुद्धा स्टार्क सामनावीर ठरला होता.

शतकी भागीदारी
रोहित शर्माने चौथ्या विकेटसाठी सुरेश रैनासोबत (५१ धावा) शतकी १२६ धावांची भागीदारी करून डाव सावरला. रोहित-रैनामुळे भारताने ३५ व्या षटकापर्यंत १८५ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या १५ षटकांत भारताची कामगिरी सुमार ठरली. या १५ षटकांत भारताने फक्त ८२ धावा काढल्या.

फिंचने डाव सावरला
विजयासाठी आवश्यक असलेल्या २६८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर अॅरोन फिंचने ९६ धावा काढल्या. त्याचे शतक थोडक्याने हुकले. फिंचने १२७ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या साह्याने ही खेळी केली. त्याच्या खेळीच्या बळावर कांगांरूनी ४९ षटकांतच ६ गड्यांच्या मोबदल्यात २६९ धावा काढून विजय साजरा केला. फिंचशिवाय ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ (४७) आणि शेन वॉटसन (४१) यांनी चांगली खेळी केली.

फ्युकनरने खेचला विजय
एक वेळ ऑस्ट्रेलियाला १० चेंडूंत १० धावांची गरज होती. मात्र, अष्टपैलू खेळाडू फ्युकनरने ४९ व्या षटकात भुवनेश्वर कुमारला २ चौकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. ब्रेड हॅडिनने नाबाद १३ धावांचे योगदान दिले. भारताकडून उमेश यादवने ५५ धावांत २ गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, मो. शमी, अक्षर पटेल आणि अश्विन यांनी प्रत्येकी एकाला टिपले. कामचलाऊ फिरकीपटू रैनाला एकही विकेट मिळू शकली नाही.