आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Open : Serena Williams Defeated Margaret Court

ऑस्ट्रेलियन ओपन: सेरेना विल्यम्सने मार्गारेट कोर्टचा केला पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विक्रमी विजय मिळवला. या विजयासह तिने महिला एकेरीची चौथी फेरी गाठली. तिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 61 वा विजय नोंदवून ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टचा विक्रम ब्रेक केला. नोवाक योकोविकने डेनिस इस्तोमिनवर 6-3, 6-3, 7-5 ने मात करून चौथी फेरी गाठली.
सेरेनाने प्रचंड उकाड्यानंतरही 31 व्या मानांकित डॅनियला हंतुचोवाचा पराभव केला. तिने स्लोव्हाकियाच्या खेळाडूला 6-3, 6-3 अशा फरकाने पराभूत केले. सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविकने स्टोसूरला 6-7, 6-4, 6-2 ने हरवले.
टॉमस बर्डिचने बोस्नियाच्या दामीर जहूरला 6-4, 6-2, 6-2 ने पराभूत केले. आता बर्डिचचा सामना 19 व्या मानांकित केविन अ‍ॅँडरसनशी होईल. दक्षिण आफ्रिकेच्या अ‍ॅँडरसनने फ्रान्सच्या एडवर्ड रॉजर वेस्लीनचा पराभव केला. पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 3-6, 4-6, 6-3, 7-6, 7-5 ने शानदार विजय मिळवला.
युकीचा धक्कादायक विजय
भारताचा युवा खेळाडू युकीने धक्कादायक विजय मिळवला. त्याने मायकेल व्हीनससोबत पुरुष दुहेरीच्या सलामी सामन्यात जीन ज्युलियन-होरिया टेकाऊला 6-4, 6-4 ने पराभूत केले. यासह या जोडीने 64 मिनिटांत दुस-या फेरीतील प्रवेश निश्चित केला. पेस-रांदेक या पाचव्या मानांकित जोडीने लुकास डूल-रोलोसला 6-4, 6-1 ने हरवले.
फेररच्या रागाचा पारा चढला
ऑस्ट्रेलियातील उष्ण वातावरणात डेव्हिड फेररच्या रागाचा पारा चढला अन् त्याने कोर्टवरच आपले रॅकेट आपटले. फ्रान्सच्या जेर्मी चार्डीविरुद्ध सामन्यादरम्यान दुसरा सेट गमावल्यानंतर त्याने आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर त्याने स्वत:ला सावरून सामना आपल्या नावे केला. त्याने 6-2, 6-7, 6-2 ने विजय मिळवला.
ली नाची लुसी सफारोवावर मात
दोन वेळची फायनलिस्ट आणि आशियातील पहिली ग्रँडस्लॅम विजेती ली नानेदेखील चौथ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला. चीनच्या ली नाने चेक गणराज्यच्या लुसी सफरोवाचा 1-6, 7-6, 6-3 ने पराभव केला. तिला पहिल्या सेटमध्ये झुंज द्यावी लागली. मात्र, चीनच्या खेळाडूने पुनरागमन करून दुस-या सेटमध्ये बाजी मारली. आता चौथ्या फेरीत ली नाचा सामना रशियाच्या मकारोवाशी होईल.