आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : नदाल, फेडरर विजयी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - जागतिक दुस-या मानांकित स्पेनचा राफेल नदाल व 16 वेळा गॅ्रण्डस्लॅम विजेता स्वीसचा रॉजर फेडरर या दोघांनी पुरुष एकेरीत शानदार विजय संपादन करून ऑस्ट्रेलियन ओपनची चौथी फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झा व महेश भूपती, लिएंडर पेस, रोहन बोपन्ना-लिसा रेमंड यांनी विजयी आघाडी घेतली आहे.
मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीतील तिस-या फेरीच्या लढती रोमांचक झाल्या. पुरुष एकेरीत स्वीसच्या टेनिसपटू फेडररला क्रोएशियाच्या इवो कार्लोविकच्या आव्हानाचा सामना करावा लागला. एकेरीच्या विजेतेपदावरचे आव्हान राखून ठेवण्यासाठी फेडररने पहिल्या सेटला दमदार सुरुवात केली. मात्र कर्लोविक याने फेडररला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी कंबर कसली. मात्र, त्याला पहिल्या सेटवर फेडररने 7-6 ने धक्का दिला. फेडररने दुसरा सेटही 7-5 गुणांनी जिंकत आपले वर्चस्व निर्माण केले. तिस-या सेटवरही फेडररला 6-3 गुणांनी बाजी मारत विजयाची नोंद करता आली. या वेळी फेडररला दिलेल्या प्रत्युत्तरात कार्लोविकने 15 एस मारले, तर फेडररला 9 एस मारता आले. मात्र तरीही फेडररला विजयाची नोंद करता आली.
महिला एकेरीत तिस-या मानांकित अझारेंकाने जर्मनीच्या मोना बार्थेल हिला सरळ सेटवर पाणी पाजले.

दुहेरीत भारतीयांचा दबदबा
भारतीय टेनिसपटूंनी शुक्रवारी स्पर्धेत विजयी धमाका उडवला. मिश्र दुहेरीत सहाव्या मानांकित सानिया मिर्झा-महेश भूपती या जोडीने 62 मिनिटांत शानदार विजय साकारला. रशियाच्या नतालिया ग्रांदी-कुराकाओ या जोडीला सानिया-भूपतीने 6-4, 6-2 गुणांनी पराभूत केले. या शानदार विजयाच्या बळावर सानिया-भूपतीने दुस-या फेरीत धडक मारली. तसेच रोहन बोपन्ना-लिसा रेमंड यांनी विजयश्री खेचून आणली. 37 मिनिटे रंगलेल्या शर्थीच्या लढतीत कझाकस्तानच्या गॅलिना-ऑस्ट्रिया या जोडीवर बोपन्ना-लिसाने मात केली. पहिला सेट 6-1 ने जिंकून आघाडी घेणा-या बोपन्ना-लिसाला दुस-या सेटवरही 6-0 ने विजयाची नोंद करता आली. पुरुष दुहेरीच्या लढतीत पेस-टिप्सेविक या जोडीने शानदार विजय संपादन केला. इटलीच्या सिमोन बोलेली -फाबियो या विजयी आघाडीच्या प्रयत्नात असलेल्या जोडीला पेस-टिप्सेविकने 89 मिनिटांत बाहेरचा रस्ता दाखवला. या लढतीत पेस-टिप्सेविकला 6-2, 7-6 गुणांनी विजय मिळवता आला.

नदालची झुंजार खेळी
पुरुष एकेरीत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणा-या नदालने एकेरीत झुंजार खेळीचे प्रदर्शन केले. स्लोव्हाकियाच्या लुकास लाकोच्या आव्हानाला प्रत्युत्तर देणा-या नदालने पहिल्याच सेटवर 6-2 गुणांनी बाजी मारून आघाडी घेतली.मात्र, दुस-या सेटवर नदालच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे नदालवर पराभवाचे सावट निर्माण झाले होते. मात्र तरीही कोणताही सेट न गमावता नदालने आपली लढत कायम ठेवली. या दुखापतीतून सावरत नदालने 1 तास 55 मिनिटांची शर्थींची झुंज देत लाकोला 6-4, 6-2 असा अनुक्रमे दुस-या व तिस-या सेटवर पराभवाची धूळ चारली. या अटीतटीच्या लढतीत नदालची दुखापत लाकोच्या पथ्यावर पडली होती. मात्र अनुभवी नदालने आक्रमक खेळी करत लाकोला पराभूत करून चौथ्या फेरीत दिमाखदार प्रवेश केला.