आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Open Tennis: Rafeal Nadal, Roger Federra Entered In Semifinal

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस: राफेल नदाल, रॉजर फेडरर उपांत्य फेरीत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - जागतिक क्रमवारीतील अव्वलस्थानी असलेला स्पेनचा राफेल नदाल आणि सहावा मानांकित रॉजर फेडररने बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर व्हिक्टोरिया अजारेंकाला उपउपांत्य फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. पोलंडच्या रांदावास्काने तिला हरवून स्पर्धेत मोठा उलटफेर केला. पुरुष दुहेरीत लियांडर पेस आणि राडेक स्टेपानेकच्या जोडीलाही पराभवाचा सामना करावा लागला.
पुरुष गटात अव्वलस्थानी असलेला टेनिसपटू राफेल नदालने 22वे मानांकनप्राप्त बल्गेरियाचा खेळाडू ग्रिगोर दिमित्रोवला हरवले. उपउपांत्य फेरीच्या या सामन्यात नदालने दिमित्रोवचा 3-6, 7-6, 7-6, 6-2 असा पराभव केला. या विजयासोबतच त्याने आपल्या कारकीर्दीत चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात दिमित्रोवने नदालला संघर्ष करण्यास भाग पाडले. पहिला सेट जिंकल्यानंतर त्याच्याकडे चांगली संधी होती, परंतु त्यानंतरच्या दोन्ही सेटचा निकाल थेट टायब्रेकपर्यंत पोहोचला. नदालने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पुनरागमन केले.
फेडररचा अँडी मरेवर विजय
पुरुष गटाच्या उपउपांत्य सामन्यात रॉजर फेडरर आणि विम्बल्डनचा विजेता अँडी मरे यांच्यात लढत झाली. तीन तास रंगलेल्या या सामन्यात फेडररने मरेचा 6-3, 6-4, 6-7, 6-3 असा चार सेटमध्ये पराभव केला. दोघांनाही दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांना रोमांचक लढतीची मेजवानी दिली. या सामन्यात फेडररने दहा फटके मारले.
दुसरी मानांकित अजारेंकाला धक्का
महिला गटात दुसरे मानांकनप्राप्त अजारेंकाला पाचवी मानांकित पोलंडची टेनिसपटू अग्निस्का रांदावास्काने 6-1, 5-7, 6-0 अशी धूळ चारून मोठा उलटफेर केला. तीन तासांपर्यंत चाललेल्या या लढतील बेलारूसच्या अजारेंकाला तिच्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. सेरेना, शारापोवानंतर अजारेंकावरही स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढावली.