आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Open: Venus Williams, Petra Quitova Victory

ऑस्ट्रेलियन ओपन: व्हीनस विल्यम्स, पेत्रा क्विताेवाने मिळवला शानदार विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : कोको वांदेवेघे
मेलबर्न - जगातील नंबर वन नोवाक योकोविक, सेरेना विल्यम्स आणि गतविजेत्या स्टॅनिस्लास वावरिंकाने गुरुवारी विजयी मोहीम अबाधित ठेवत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. दुसरीकडे बिगरमानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाने महिला गटात सहज विजयाची नोंद करून पुढची फेरी गाठली.

सर्बियाच्या योकोविकने पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत शानदार विजय संपादन केला. त्याने लढतीत ८८ व्या मानांकित आंद्रे कुज्नेत्सोवाचा पराभव केला. अव्वल मानांकित योकोविकने ६-०, ६-१, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. त्याने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारली. त्यानंतर त्याने दुस-या आणि तिस-या सेटमध्येही आक्रमक सर्व्हिसची लय कायम ठेवली. यासह त्याने सामना आपल्या नावे केला.

महिला एकेरीत सेरेना विल्यम्सने आपली सहकारी लॉरेन डेव्हिसचा पराभव केला. तिने ६-२, ६-३ अशा फरकाने सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. डोमिनिका सिबुलकोवाने बुल्गारियाच्या स्वेतलाना पिरोनकोवाला धूळ चारली. तिने ६-२, ६-० ने सामना आपल्या नावे केला. त्यापाठोपाठ पेत्रा क्वितोवाने जर्मनीच्या मोना बार्थेलला बाहेरचा रस्ता दाखवला. तिने ६-२, ६-४ ने विजय संपादन केला. यासह तिने महिला गटात आगेकूच केली. तसेच पोलंडच्या रंदावास्काने स्वीडनच्या जोहाना लार्सनचा ६-०, ६-१ ने पराभव केला.

वावरिंकाचा विजय : गतविजेत्या वावरिंकाने दुस-या फेरीत डोनाल्ड यंगविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. त्याने ६-४, ७-६, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह सरळ तीन सेटपर्यंत दिलेली झुंज अपयशी ठरली.

कोकोचा विजय
ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. तिला बिगरमानांकित कोको वांदेवेघेने पराभूत केले. तिने ६-६, ६-४ अशा फरकाने सामन्यात सनसनाटी विजयाची नोंद केली. तिने तिसरी फेरी गाठली.

बोपन्ना दुस-या फेरीत
भारताचा रोहन बोपन्ना व डॅनियल नेस्टरने पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली. या जोडीने सायप्रसच्या मार्कोस बगदातीस व ऑस्ट्रेलियाच्या मारिंकोला ७-६, ७-५ ने हरवले.

वोज्नियाकी पराभूत
बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने सनसनाटी विजय संपादन केला. तिने कॅरोलिन वोज्नियाकीचा पराभव केला. तिने ६-४, ६-२ ने सामना जिंकला.

भूपती-मेल्झरचे आव्हान संपुष्टात
भारताचा अनुभवी खेळाडू महेश भूपतीचे आपला सहकारी जुर्गेन मेल्झरसोबतचे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या जोडीला सलामी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

अर्जेंटिनाचा डिएगो श्वार्जमन आणि होरासियो झेबाल्लोस यांनी ६-४, ६-३ अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. या धक्कदायक पराभवासह ६७ मिनिटांत भारताच्या महेश भूपती- मेल्झर या जोडीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तब्बल नऊ महिन्यांनंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन करणा-या भारताच्या महेश भूपतीला फार काळ आव्हान कायम ठेवता आले नाही. त्यामुळे त्याला पहिल्याच फेरीतील पराभवाने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.