Home »Sports »From The Field» Australia Turn Tables On Wobbly West Indies

विंडीज-ऑस्‍ट्रेलिया कसोटी रंगतदार अवस्‍थेत

वृत्तसंस्था | Apr 11, 2012, 12:16 PM IST

  • विंडीज-ऑस्‍ट्रेलिया कसोटी रंगतदार अवस्‍थेत

ब्रिजटाऊन- ब्रिजटाऊन येथे खेळण्‍यात येत असलेल्‍या ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्‍ट इंडीज यांच्‍यामधील कसोटी सामना कमालीचा रंगतदार अवस्‍थेत पोहोचला आहे. विंडीजने दुस-या डावात पाच बाद 71 धावा केल्‍या असून 114 धावांची त्‍यांनी आघाडी घेतली आहे.
तिस-या दिवसअखेर ऑस्‍ट्रेलियाचा डाव अडचणीत आला होता. एकवेळ त्‍यांची अवस्‍था पाच बाद 285 धावा झाली होती. परंतु, तळाच्‍या फलंदाजांनी ऑस्‍ट्रेलियाला चांगलेच सावरले. रेयॉन हॅरिस, बेन हिल्‍फेनहास आणि नॅथन लियॉन या गोलंदाजांनी फलंदाजीतील आपला रंग दाखवून दिला. हॅरीसने नवव्‍या गडयासाठी विंडीजविरूद्ध सर्वोच्‍च धावसंख्‍या नोंदवली. त्‍याने सात चौकारांच्‍या मदतीने 68 धावा केल्‍या. 11 व्‍या क्रमांकावर येऊन लियॉनने नाबाद 40 धावा जमवल्‍या. हिल्‍फेनहासनेही महत्‍वपूर्ण अशा 24 धावा ठोकल्‍या. ऑसीच्‍या शेवटच्‍या तीन फलंदाजांनी 156 धावा जमवल्‍या. यांच्‍या फलंदाजीमुळे अडचणीत आलेला ऑसी संघ विंडीजला चांगलेच प्रत्‍युत्‍तर देऊ शकला.
शेवटच्‍या अर्ध्‍या तासाचा फायदा उठवण्‍यासाठी ऑसी कर्णधार मायकेल क्‍लार्कने धोका पत्‍कारून 406 धावांवरच डाव घोषित केला. क्‍लार्कचा निर्णय त्‍याच्‍या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. हिल्‍फेनहासने तीन, हॅरीस आणि सीडल यांनी प्रत्‍येकी एक-एक गडी टिपला. विंडीजच्‍या एकाही फलंदाजाला स्थिरावण्‍याची त्‍यांनी संधीच दिली नाही. पहिल्‍या डावातील शतकवीर चंदरपॉलला 12 धावांवर हॅरीसने बाद केले. तर स्थिरावलेल्‍या ब्राव्‍होला सीडलने यष्‍टीरक्षक मॅथ्‍यू वेडकडे झेल देण्‍यास भाग पाडले. पहिल्‍या डावातील 43 आणि सध्‍याच्‍या 71 धावा मिळून विंडीजकडे अजूनही 114 धावांची आघाडी आहे. उद्या शेवटचा दिवस असून विंडीजचे तळाचे फलंदाज किती प्रतिकार करतात आणि ऑसी किती लवकर त्‍यांना गुंडाळेल हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरेल. चौथ्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विंडीजने दुस-या डावात पाच गडयांच्‍या बदल्‍यात 71 धावा बनवल्‍या आहेत. देवनारायण 20 धावा आणि कार्ल्‍टन बाघ दोन धावांवर खेळत आहे.

Next Article

Recommended