आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहाली- पहिल्या दिवसाचा खेळ पावसाने वाया गेल्यानंतर दुस-या दिवशी भारतानेच वर्चस्व राखले. दुस-या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 7 बाद 273 धावांपर्यंत मजल मारली होती. एड कोवान (86), डेव्हीड वॉर्नर (71) आणि स्टीव्ह स्मिथ (नाबाद 58) यांच्या अर्धशतकांनी ऑस्ट्रेलियाला सावरले. कोवान आणि वॉर्नर (71) या जोडीने दमदार 139 धावांची सलामी दिली. परंतु, ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडत गेल्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रविंद्र जडेजाने 3, इशांत शर्माने 2 तर आर. अश्विन आणि प्रग्यान ओझाने प्रत्येकी 1 बळी घेतला.
एड कोवानचे शतक हुकले
सलामीवीर एड कोवान 86 धावांवर बाद झाला. विराट कोहलीने स्लिपमध्ये त्याचा झेल घेतला. कोवानला 85 धावांवर चेतेश्वर पुजाराने जीवदान दिले होते. परंतु, त्याचा फायदा घेऊन शतक पूर्ण करण्याची संधी कोवानने गमाविली. त्याने वॉर्नरसोबत 139 धावांची दमदार सलामी दिली. परंतु, मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला.
इशांतचा डबल धमाका
कोवान बाद झाल्यानंतर ब्रॅड हॅडीन आणि स्टीव्ह स्मिथ ही जोडी जमली होती. दोघांनी 46 धावांची भागीदारी केली. परंतु, इशांतने हॅडीनचा त्रिफळा उडविला. त्यानंतर आलेल्या हेन्रिक्सचाही त्याने शुन्यावर त्रिफळा उडविला. हॅडीनने इशांतला पुल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू तेवढा उसळला नाही. बॅटला लागून चेंडू स्टंपवर आदळला. त्याने 21 धावा काढल्या. तर त्याच्यानंतर आलेल्या हेन्रिक्सला तर इशांतने अप्रतिम चेंडू टाकला. चेंडू रिव्हर्स स्विंग झाला आणि हेन्रिक्सचा त्रिफळा उडवून गेला.
फिल ह्युजेस पुन्हा अपयशी
शतकी सलामी देणा-या जोडीला रविंद्र जडेजाने फोडल्यानंतर फॉर्मात नसलेल्या फिलीप ह्युजेसला प्रग्यान ओझाने बाद केले. त्याने केवळ 2 धावा काढल्या. किंचित जास्त उसळलेल्या चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतली. धोनीने सोपा झेल घेऊन सोपस्कर पूर्ण केले. ह्युजेस या मालिकेत सपशेल अपयशी ठरला आहे.
जडेजाचा दुहेरी दणका, क्लार्क शुन्यावर बाद
सलामीची जोडी जडेजानेच फोडली. त्याने ऑस्ट्रेलियाला दुहेरी दणका दिला. वॉर्नर आणि कर्णधार मायकल क्लार्कला त्याने लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. डेव्हीड वॉर्नरला त्याने 71 धावांवर बाद केले. जडेजाच्या एका आत वळणा-या चेंडूवर वॉर्नर चुकला. चेंडू बॅटची आतली कड घेऊन पॅडवर गेला. त्यानंतर उडालेला झेल धोनीने घेतला.
त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने क्लार्कला शुन्यावर बाद केले. त्याला धोनीने यष्टीचित केले. क्लार्कला धोनीने संधीच दिली नाही. जडेजाला अर्धवट पुढे येऊन खेळताना त्याचा पाय क्रिझच्या बाहेर गेला आणि धोनीने क्षणाचाही विलंब न करता बेल्स उडविल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.