आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Batsman Phillip Hughes Dies In Hospital During Medicale

वेदनादायी: वाढदिवसाच्या ३ दिवसांआधी क्रिकेटपटू फिलिप ह्यूज याचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - एका खेड्यातून राष्ट्रीय संघापर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिलिप ह्यूजसाठी क्रिकेटच सर्वस्व होते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी मैदानावरच आयुष्यासह क्रिकेटशी जुळलेली नाळ कायमची तुटली. आता फक्त त्याच्या अविस्मरणीय आठवणी उरल्या आहेत.

न्यू साऊथ वेल्समधील केळींसाठी प्रसिद्ध असलेल्या मॅक्सविल्ले गावात ३० नोव्हेंबर १९८८ रोजी फिलिपचा जन्म झाला होता. प्रचंड आत्मविश्वास आणि प्रतिभेच्या जोरावर त्याने वयाच्या १८ वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात केली. त्यानंतर २००९ मध्ये अल्पावधीत ह्यूजने कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले. यासह त्याने क्रिकेटमधील दिग्गजांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले.

तसेही तांत्रिक आणि खासकरून शॉर्ट पिचवरच्या चेंडूंचा सामना करण्यात अपयशी ठरत असलेल्या ह्यूजला नेहमी टीकेला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्याला राष्ट्रीय संघात कायमस्वरूपी स्थान मिळवता आले नाही. ह्यूजने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले हाेते.

काचे समोर सराव : ह्यूज तास न् तास सराव करायचा. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्यूज दिवसभर घरातच क्रिकेटचा सराव करत असे. तसेच रात्रीच्या वेळी तो काचेच्या समोर स्ट्रोक प्लेचा सराव करायचा.

सीनचा पहिलाच सामना
फिल ह्यूजप्रमाणेच सीन एबोटनेही वयाच्या १८ व्या वर्षी क्रिकेटच्या विश्वात पदार्पण केले. त्याने १८ व्या वर्षी न्यू साऊथवेल्स संघाकडून क्रिकेटला सुरुवात केली. तो वेगवान गोलंदाज आहे. त्याने एक वनडे आणि तीन टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २०१३-१४ च्या रॉबी चषकात सर्वाधिक १६ विकेट घेतल्या होत्या.

कसोटीच्या दोन्ही डावांत शतके
मॅथ्यू हेडनच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटला ह्यूजच्या रूपाने नवा तारा गवसला. त्याने संघात सलामीवीराची भूमिका बजावली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २००९ मध्ये कसोटी संघात स्थान मिळवले. दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत शानदार शतक झळकावले होते. याशिवाय तो हे यश संपादन करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता. पहिल्या कसोटीत ७५ धावा काढल्या होत्या.

ह्यूजविषयी थोडक्यात
नाव : फिलिप जोएल ह्यूज
जन्म : ३० नोव्हेंबर १९८८
जन्मस्थळ : मॅकसिल्वे (न्यू साऊथ वेल्स, ऑस्ट्रेलिया)
टोपण नाव : ह्यूजेसी
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
- २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटीला प्रारंभ
- २६ नोव्हेंबर २००९ पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
- १८ जुलै २०१३ शेवटची कसोटी इंग्लंडविरुद्ध
- २०१३ मध्ये एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात
- ११ जानेवारी २०१३ पहिला वनडे श्रीलंकेविरुद्ध
- १२ ऑक्टोबर २०१४ शेवटचा वनडे पाकिस्तानविरुद्ध

मैदानावरील दुर्घटना
- रेनडलच्या डोक्याला झाली होती दुखापत : मागच्या वर्षी द. आफ्रिकेचा ३२ वर्षीय यष्टिरक्षक डॅरेन रेनडलला दुखापत झाली. क्रीजच्या पुढे येऊन मारण्याच्या नादात चेंडू त्याच्या डोक्याला लागला होता. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

- भट्टीच्या छातीला लागला चेंडू : २०१३ मध्ये एका क्लब सामन्यात फलंदाजी करताना चेंडू पाकचा २२ वर्षीय युवा फलंदाज झुल्फिकार भट्टीच्या छातीला लागला. नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पाकचाच १८ वर्षीय यष्टिरक्षक अब्दुल अजिजचासुद्धा १९५९ मध्ये कराचीत एका सामन्यात छातीला चेंडू लागल्याने मृत्यू झाला होता.

- मैदानावर हार्टअ‍ॅटॅक : इंग्लंडचा ३३ वर्षीय वेगवान गोलंदाज रिचर्ड बुमोंट २०१२ मध्ये एका क्लब सामन्यादरम्यान हार्टअ‍ॅटॅकमुळे मैदानावरच कोसळला होता.

- वसीम राजाला हार्टअ‍ॅटॅक : २००६ मध्ये पाकच्या वसीम राजाचा बर्किंघमशायरमध्ये सरेकडून खेळताना हार्टअ‍ॅटॅकने मृत्यू झाला.

- पंचाचेही मैदानावर निधन : खेळाडूच नव्हे, तर २००९ मध्ये इंग्लंडचे ७२ वर्षीय पंच एल्विन जेनकिन्सच्या डोक्यास खेळाडूकडून थ्रो करण्यात आलेला चेंडू लागला. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

- डोळ्यावर चेंडू लागला : १९९३ मध्ये देशांतर्गत सामन्यात ३० वर्षीय इयान फोले फटका खेळताना चेंडू त्याच्या डोळ्याला लागला. रुग्णालयात नेल्यानंतर हार्टअ‍ॅटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला.

- लॉर्ड्सवर बळी : लॉर्ड्सवर १९४२ मध्ये इंग्लंडचे ५६ वर्षीय अँडी डुकेट एका कसोटी सामन्यात हार्टफेल झाल्याने बेशुद्ध होऊन मैदानावर कोसळले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. १९७० मध्ये फलंदाजी करीत असताना जॉर्ज समर्सच्या डोक्याला चेंडू लागला. काही दिवसांनी त्याचे निधन झाले.
नस तुटल्याने फिलिपचा मृत्यू
- ह्यूजच्या डोक्याच्या मागील बाजूवर चेंडू आदळला होता. चेंडूचा वेग ताशी १४० किमी होता.
- चेंडू लागल्याने मेंदूपर्यंत जाणारी रक्तवाहिनी तुटली होती. यामुळे मेंदूत रक्तस्राव होऊ लागला होता.
- डॉक्टर टोनी ग्रॅब्ज म्हणाले, - हा दुर्मिळ अपघात होता. क्रिकेटमध्ये अशी घटना यापूर्वी कधी पाहण्यात आली नाही. इतिहासात आजवर अशा फक्त शंभरच घटना घडल्या आहेत.

हलके हेल्मेट घातल्यामुळे : ह्यूजने खूपच हलके हेल्मेट घातले होते, असे क्रिकेट साहित्य उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे. सुरक्षा मानकांकडे फारसे लक्ष दिले जात नाही, त्यामुळे अशा घटना घडतात.
पुढे वाचा, रमण लांबाचाही झाला होता असाच मृत्यू...