सिडनी - ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल या स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सलगच्या मोठय़ा स्पर्धेतील अपयशातून सावरलेल्या सायनाचा किताबावर नाव कोरण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे भारताची युवा खेळाडू पी. सी. तुलसीदेखील ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नशीब आजमावणार आहे. तिच्यावर सर्वांची नजर असेल.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या सायना नेहवालला यंदाच्या सत्रात अद्याप समाधानकारक कामगिरी करता आली नाही. तिला नुकताच इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. आता सिडनी येथे सुरू होणार्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सायना सज्ज आहे. तिचा सलामी सामना चीनच्या सून यूशी होईल. तसेच तुलसीसमोर पहिल्या फेरीत मलेशियाच्या जेसी सुबांधीचे तगडे आव्हान असेल.
सिंधूला आठवे मानांकन
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सिंधूला महिला एकेरीत आठवे मानांकन देण्यात आले आहे. सायना, तुलसीपाठोपाठ सिंधूवरही सर्वांची नजर असेल. तिचा पहिला सामना जपानच्या आया ओहोरीशी होणार आहे.