आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस: सेरेनाची आगेकूच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स, नोवाक योकोविक आणि गतविजेत्या वावरिंकाने शनिवारी विजयी लय अबाधित ठेवत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम १६ मध्ये धडक मारली. महिला गटात माजी नंबर वन व्हीनसनेही आगेकूच कायम ठेवली.

सहाव्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या किताबासाठी उत्सुक असलेल्या सेरेनाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. पहिला सेट गमावल्यानंतर पुढचे दोन्ही सेट जिंकून तिने अनुभवाच्या बळावर सामना पलटवला. महिला एकेरीत २६ वी मानांकित एलिना स्वितोलिनाने तिला पहिल्या सेटमध्ये ६-४ ने पराभूत करून धक्कादायक सुरुवात केली. या सामन्यात धक्कादायक निकाल लागतो की काय, असे सर्वांना वाटत होते. मात्र, सेरेनाने अनुभव पणाला लावताना पुढचे दोन्ही सेट जिंकले. तीन सेटचा हा सामना अमेरिकन खेळाडूने ४-६, ६-२, ६-० असा जिंकला. आता सेरेनाचा सामना स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजाशी होईल. स्पेनच्या या खेळाडूने सामन्यात स्विसच्या टिमिया बासिंज्कीवर मात केली. तिने ६-३, ४-६, ६-० अशा फरकाने विजय संपादन केला. यासह तिने अंतिम १६ मधील प्रवेश निश्चित केला. मिलोस राओनिक, निशिकोरी विजयी पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत आठव्या मानांकित मिलोस राओनिक आणि पाचव्या मानांकित केई निशिकोरीने शानदार विजय मिळवला. जपानच्या निशिकोरीने सामन्यात अमेरिकेच्या जॉन्सनचा पराभव केला. त्याने ६-७, ६-१, ६-२, ६-३ अशा फरकाने सामन्यात रोमांचक विजय मिळवला. कॅनडाच्या मिलोसने इंग्लंडच्या बेकरवर ६-४, ६-३, ६-३ ने मात केली. या विजयानंतर सेरेनाचे कारकीर्दीतील १९ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची आशा कायम आहे. सेरेनाच्या विल्यम्सच्या नावे सध्या १८ ग्रँडस्लॅम असून ती क्रिस इव्हर्ट आणि मार्टिना नवारातिलोवाच्या बरोबरीत आहे. मात्र, ऑल टाइम ग्रेट खेळाडू स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅमच्या तुलनेत सेरेना अद्याप ४ किताबाने मागे आहे. ज्या वेळी शंका असते, त्या वेळी लवकरात लवकर पळायचे, खेळायचे, असा सल्ला मला नेहमी माझी बहीण व्हीनस विल्यम्स देते. मी तिचा सल्ला नेहमी एकते, असे सेरेना सामन्यानंतर म्हणाली.

४ वर्षांनी व्हीनस चौथ्या फेरीत
जगातील माजी नंबर वन व्हीनसने दीर्घ मेहनतीच्या बळावर तब्बल चार वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन ओपनची चौथी फेरी गाठली. तिने इटलीच्या कामिला जियोर्जीचा पराभव केला. व्हीनसने ४-६, ७-६, ६-१ ने शानदार विजय संपादन केला. यापूर्वी तिने २०११ च्या विम्बल्डननंतर हे यश संपादन केले.

वावरिंकाची जार्कोवर मात
गतविजेत्या वावरिंकाने पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत फिनलंडच्या जार्को निईमिनेनवर मात केली. त्याने ६-४, ६-२, ६-४ अशा फरकाने शानदार विजय साकारला. यासाठी त्याने तीन सेटपर्यंत झुंज दिली. मात्र, यात सरस खेळी करून त्याने जार्कोला बाहेरचा रस्ता दाखवला.

योकोविकची आगेकूच
वावरिंकापाठोपाठ पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत अव्वल मानांकित नोवाक योकोविकेनेही धडक मारली. सर्बियाच्या योकोविकने तिस-या फेरीत स्पेनच्या फर्नांडो वर्दावस्कोविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. त्याने ७-६, ६-३, ६-४ अशा फरकाने सामना आपल्या नावे केला. स्पेनच्या ३१ व्या मानांकित खेळाडूने जगातील नंबर वन योकोविकला पहिल्याच सेटवर चांगलेच झुंजवले.

महेश भूपतीचे आव्हान संपुष्टात
भारताचा महेश भूपती आणि त्याची जोडीदार जर्मिला गाजदोसोवा यांचा मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव झाला. भूपती-गाजदोसोवा यांना तैवानचा हाओ चिंग चान आणि जेमी मरे यांनी ६-४, ६-७, ८-१० ने पराभूत केले. भूपतीचा पुरुष दुहेरीतसुद्धा यापूर्वीच पराभव झाला आहे. मिश्रा दुहेरीत भूपतीचे आव्हान अवघ्या ४० मिनिटांत संपले.