आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगारुंचा माइंड गेम सुरु; सचिन, सेहवाग ऑस्‍ट्रेलियाच्‍या निशाण्‍यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेचा थरार या महिन्‍याच्‍या अखेरीस अनुभवायला मिळणार आहे. परंतु, मैदानावर द्वंद्व रंगण्‍यापूर्वी कांगारुंनी आतापासूनच शाब्दिक युद्ध सुरु केले आहे. संघातील खेळाडूच नव्‍हे तर माजी क्रिकेटपटुंनीही त्‍यात उडी घेतली आहे. कांगारुंचे सर्वात मोठे लक्ष्‍य म्‍हणजे सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग. त्‍यानंतर कांगारुंच्‍या राडारवर आहे हरभजन सिंग.

कोणत्‍याही क्रिकेट दौ-यापूर्वी ऑस्‍ट्रेलियाचे खेळाडू शाब्दिक युद्ध सुरु करतात. हा एकप्रकारे मानसिक दडपण वाढविण्‍याचा प्रकार असतो. नेहमीप्रमाणे सचिन तेंडुलकर ऑस्‍ट्रेलियाच्‍या हिट लिस्‍टवर आहे. माजी कर्णधार इयन चॅपेल म्‍हणाले, या मालिकेत सचिन तेंडुलकर चांगली कामगिरी करु शकला नाही, तर तो निवृत्ती घेईल. ही मालिका सचिनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. चॅपेल यांनी सेहवागबद्दल सांगितले, वेगवान गोलंदाज मिशले स्‍टार्क सेहवागला रोखण्‍यास सक्षम आहे. त्‍याच्‍याविरुद्ध सेहवाग प्रभावी ठरु शकणार नाही. स्‍टार्कच्‍या गोलंदाजीत विविधता आहे. तसेच उजव्‍या हाताने खेळणा-या फलंदाजांविरुद्ध तो यशस्‍वी ठरला आहे.

खरे तर हरभजन सिंगने मालिकेपूर्वी मैदानाबाहेरील जुगलबंदीला सुरुवात केली होती. कसोटी क्रिकेट कसे खेळायचे, हे आता भारत ऑस्‍ट्रेलियाला सांगेल, अशी फिरकी भज्‍जीने घेतली होती. त्‍यावरुन ऑस्‍ट्रेलियाचा सलामीवीर फिल ह्युजेसने प्रत्‍युत्तर दिले आहे. भारतीय फिरकीपटुंना खेळताना ऑस्‍ट्रेलियाला अडचण येणार नाही, असे त्‍याने म्‍हटले आहे.

आजपासून क्रिकेटमधील या युद्धाचा पहिला अंक सुरु होत आहे. ऑस्‍ट्रेलियाचा पहिला सराव सामना अध्‍यक्षीय एकादश संघासोबत होणार आहे. त्‍यात भारताच्‍या दुस-या फळीतील खेळाडुंची चांगलीच कसोटी लागणार आहे. या सामन्‍याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.