आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Award Politics: Many Defencies In Laws Sport Co Director Confession

पुरस्कारांचे राजकारण: नियमावलीत त्रुटी असल्याची क्रीडा सहसंचालकांची कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तब्बल पाच वर्षांनंतर जाहीर केलेल्या शिवछत्रपती पुरस्कारानंतर विविध खेळांतील गुणी व योग्य खेळाडूंना पुरस्कारांपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. अशा अन्याय झालेल्या अनेक खेळाडूंनी गुरुवारी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेच्या पुढाकाराने अजित पवार यांना भेटून खेळाडू व क्रीडा कार्यकर्त्यांनी पुरस्कार निवड प्रक्रियेतील त्रुटी दाखवून दिल्या.
त्या वेळी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्याशी दूरध्वनीवरून त्वरित संपर्क साधून विचारणा केली. कालच कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही पारदर्शक निवड केल्याचे तुम्ही सांगितले होते, मग आज हे खेळाडू तक्रार घेऊन कसे आले, असा सवाल अजित पवार यांनी सोपल यांना केला.
त्या वेळी सोपल यांनी अजित पवार यांना सांगितले, ‘नव्या धोरणातील त्रुटींमुळे खरे खेळाडू पात्र असतानाही अपात्र ठरवले गेले. धोरण ठरवताना समिती सदस्यांच्याच संमतीने नियम, निकष ठरवले गेले होते.’ त्या सदस्यांची नावेही सोपल यांनी अजित पवारांना सांगितली. अजित पवारांनी त्यानंतर क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांना परिस्थितीची जाणीव करून दिली व 26 जानेवारीनंतर पुढील आठवड्यात यासंदर्भात बैठक घेऊन त्या बैठकीला जलतरण संघटनेच्या व अन्य संबंधितांना बोलावून नियमातील त्रुटी दूर करण्यास सांगितले.
अजित पवारांना भेटलेल्या जलतरण संघटनेच्या शिष्टमंडळात किशोर वैद्य, राजू पालकर, श्रीनिक जांभले, शिल्पा भोसले आदींचा समावेश होता.
राही सरनौबतला पुरस्कार द्यायचा राहून गेला : वळवी
राही सरनौबत ही भारताची आघाडीची नेमबाज आहे. मात्र, या वेळी तिला पुरस्कार द्यायचा राहून गेला. ती महाराष्ट्राची शान आहे. त्यामुळे शिवछत्रपती पुरस्कार तिला निश्चितच मिळणार, याची खात्री बाळगा, असे क्रीडा राज्यमंत्री पद्माकर वळवी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. आम्ही 2012-13 व 2013-14 या वर्षासाठीच्या पुरस्कारांचे अर्ज लगेच मागवणार आहोत. तसे लवकरच जाहीर करणार आहोत. त्या वेळी राहीला थेट छत्रपती पुरस्कार मिळेल. मात्र, या वेळी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये तो राहून गेला होता. ती चूक आम्ही निश्चित सुधारू, असे वळवी पुढे म्हणाले.