आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshar Patel, Suresh Raina On Selectors' Radar Ahead Of Sydney Test

चौथ्या कसोटीत रैना-पटेल खेळण्याची दाट शक्यता, शिखर धवनला डच्चू?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती घेतल्यामुळे टीम इंडियाची नव्याने बांधणी करण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनासमोर येऊन ठेपले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना मंगळवारपासून खेळला जाईल. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघाचा समतोल नेमका कसा असेल, यावर संघव्यवस्थापन चर्चा करत आहे. या सामन्यात डावखुरा फलंदाज सुरेश रैना आणि गुजरातचा फिरकीपटू अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, धोनीच्या निवृत्तीनंतर यष्टिरक्षणासाठी पर्याय म्हणून वृद्धिमान साहाचाही विचार होऊ शकतो. मात्र, त्याबाबतच अजूनही साशंकता आहे. २०१५ मधील व्यस्ततेचा विचार करून संघव्यवस्थापन संघात काही फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. चौथा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाणार असून येथील खेळपट्टी मध्यमगती तसेच फिरकीपटूंना मदत करणारी आहे. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी तसेच दुसर्‍या आणि तिसर्‍या डावाच्या शेवटी फिरकीपटूची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे यासाठी भारतीय संघात एका फिरकीपटूचा विचार केला जाऊ शकतो.

अक्षरची प्रभावी गोलंदाजी
गुजरातचा युवा फिरकीपटू अक्षर पटेलने त्याच्या प्रभावी गोलंदाजीने निवड समितीला आकर्षित केले आहे. गुजरातचा फिरकीपटू अक्षर पटेलला या सामन्यात खेळायला मिळण्याची दाट शक्यता आहे. भारताचा सध्याचा आघाडीचा फिरकीपटू आर.अश्विनच्या जागी अक्षरची या मालिकेसाठी निवड करण्यात आलेली आहे. दरम्यान, कर्णधार विराट कोहलीनेही अक्षर पटेलवर विश्वास टाकल्याचे दिसून येते. कारण, त्याच्या नेतृत्वात अक्षरने करिअरचे सर्वाधिक ९ सामने खेळले आहेत. त्याने मागच्या सत्रातील ११ स्थानिक सामन्यांत ३८ बळी घेतले होते. तळात फलंदाजी करण्यासही तो सक्षम आहे.

फलंदाजीत बदल शक्य
भारतीय संघात फलंदाजीत दोन बदल केले जाण्याची दाट शक्यता आहे. बर्‍याच संधी मिळूनही फॉर्ममध्ये न परतलेला सलामीवीर शिखर धवन चौथ्या कसोटीत बाहेर बसू शकतो. सोबतच पदार्पणाच्या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी न करू शकणारा लोकेश राहुललाही या सामन्यात डावलण्यात येऊ शकते. त्यांच्यापैकी एकाच्या जागी रैनाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. फलंदाजीसोबतच पार्टटाइम फिरकीपटू म्हणून रैनाची संघाला मदत होऊ शकते.

अजिंक्य रहाणे किंवा अश्विन उपकर्णधार ?
विराट कोहली टीम इंडियाच्या कसोटीचा कर्णधार बनल्यामुळे आता त्याच्या जागी उपकर्णधार कोण? हा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. उपकर्णधारपदाच्या शर्यतीत अजिंक्य रहाणे आणि रवीचंद्रन अश्विन यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. संदीप पाटील यांच्या नेतृत्वातील बीसीसीआयची निवड समिती कोणता निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या पदासाठी संघाचे संचालक रवी शास्त्री यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, सध्या अजिंक्य रहाणे हाच उपकर्णधार बनेल, अशी दाट शक्यता आहे.

भारतीय क्रिकेटला दिशा हवी : लॉसन
महेंद्रसिंग धोनीने अकस्मातपणे निवृत्ती स्वीकारली असली तरी आता भारतीय क्रिकेटला नव्या दिशेची गरज आहे. भारतीय क्रिकेटचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहली नेतृत्वासाठी सज्ज आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जॉफ लॉसनने व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेतील अ‍ॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाची चुणूक दिसली. दरम्यान, शेवटच्या कसोटीत महेंद्रसिंग धोनी खेळेल अशी अन्य क्रीडाप्रेमींप्रमाणे आपलीही इच्छा असल्याचे लॉसनने म्हटले आहे.