आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ayaj Meman Article On Indian Cricket Team Success

उशीर होण्यापूर्वीच टीम इंडियाने सावरावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने पहिल्या वनडेत क्रमांक एकवर असलेल्या टीम इंडियाला दयनीय पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. भारताचा हा पराभव अनपेक्षित आहे. कारण त्याने यंदा लागोपाठ सहा एकदिवसीय मालिका जिंकण्याची कमाल केलेली आहे. भारत पहिल्या सामन्यात खराब गोलंदाजी आणि खराब फलंदाजीमुळे हरला. आपले गोलंदाज विरोधकांना चकवू शकले नाहीत, त्याच वेळी आमचे फलंदाजही उसळते चेंडू धडपणे खेळू शकले नाहीत.अद्याप दोन एकदिवसीय सामने व्हायचे आहेत. त्यानंतर कसोटी मालिका आहे. टीम इंडियाने कसोटी सामन्यांपूर्वीच सावरावे, नाहीतर तिला रिक्तहस्तेच परतावे लागू शकते.
तसे बघितले तर विदेशी भूमीवर भारतापुढे तंत्रशुद्धता, धोरणात्मकता आणि सामना जिंकून देणारा चेहरा या तीन समस्या आहेत. भारताच्या थिंक टँकने वेळेआधीच या समस्यांचे निराकरण करावे, जेणेकरून नंतर असे वाटू नये की, आता खूप उशीर झाला आहे. पहिल्या सामन्याचेच उदाहरण घेतले तर पहिल्या दोन समस्या तंत्रशुद्धता आणि धोरणात्मकतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतील. द. आफ्रिकेने आपल्या गोलंदाजांची धुलाई करीत 358 धावा चोपल्या आणि धोनीची कुठलीच धोरणे उपयुक्त ठरली नाहीत. त्याच वेळी आपल्या गोलंदाजांमध्येही चेंडू अपेक्षित गती आणि स्विंग करून फेकण्याची क्षमता दिसली नाही, ज्याद्वारे ते यजमान संघाला रोखू शकतील. फक्त गोलंदाजच नव्हे, तर आपल्या फलंदाजांनीही निराशच केले. ते डेल स्टेन आणि मोर्ने मोर्केल यांचे उसळते चेंडू योग्य तंत्रासह खेळू शकले नाहीत. द. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली त्याच वेळी आपले गोलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. योग्य तर्‍हेने गोलंदाजी केली गेली असती तर यजमान संघ जास्तीत जास्त 280/290 धावाच करू शकला असता.
उमेश यादव संघात का नाही ?
भारतीय संघापुढे आणखी एक द्विधा स्थिती होती, ती म्हणजे तिघे जलदगती गोलंदाज मो. शमी, भुवनेश्वरकुमार व मोहित शर्मा हे केवळ तरुणच नाहीत तर त्यांना विदेशी भूमीवर आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभवही कमी आहे. आपले हे गोलंदाज डेथ ओव्हर्समध्येही उपयुक्त ठरले नाहीत. अशा वेळी जलदगती गोलंदाज उमेश यादव याला 11 जणांमध्ये का सहभागी केलेले नव्हते हे समजायला मार्ग नाही. उमेश या तिघांपेक्षा अधिक अनुभवी आहे. त्याच्या गोलंदाजीची गतीही यांच्यापेक्षा जास्त आहे.
युवी किंवा रैनाला बाहेर करा
फलंदाजांच्या खराब कामगिरीबद्दल माझे मत आहे की, युवराजसिंग किंवा सुरेश रैना यांच्यापैकी एकाला 11 जणांच्या संघातून बाहेर क ाढले जावे. हे दोघेही आखूड टप्प्याचे चेंडू सध्या नीट खेळू शकत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या जागी अंबाती रायडू किंवा अजिंक्य रहाणे यांना संधी दिली जावी.
सराव सामने म्हणून खेळावे
आता दोन एकदिवसीय सामने उरले आहेत. टीम इंडियातील स्टार खेळाडूंनी हे दोन्ही सामने प्रचंड आत्मविश्वास व हिमतीसह खेळावे. त्यांना त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे हे सामने कसोटी सामन्यांसाठीचे सराव सामने म्हणून खेळावे आणि विरोधकांना नमवूनच दाखवावे. टीम इंडिया यामध्ये विजयी ठरली तर यजमान संघावर मोठा दबाव निर्माण होईल. याचा लाभ आपल्याला कसोटी सामन्यांत होईल.