आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा विशेष: रॉबिन उथप्पा, संदीप शर्माचा दावा मजबूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाच्या सातव्या सत्रातील आयपीएलमध्ये दोन क्रिकेटपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. यात कोलकाता नाइट रायडर्सचा रॉबिन उथप्पा आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संदीप शर्माचा समावेश आहे. या दोघांची निवड टीम इंडियामध्ये व्हायलाच हवी. बांगलादेश दौर्‍यासाठी या दोघांची निवड न झाल्यास मला आश्चर्याचा धक्काच बसेल.
भारतीय संघ सध्या वनडे क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर आहे. खेळाडू धावा काढण्यात व विकेट घेण्यात कमी पडल्यामुळे भारताची दुसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे. आयपीएल-7 मध्ये टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन पहिल्यासारखा फॉर्ममध्ये दिसत नाही. उमेश यादव व मोहंमद शमी यांनाही फारसी कमाल करून दाखवता आली नाही. हे दोघेही सध्या महागडे गोलंदाज ठरत आहे.

उथप्पा अनेक वर्षांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे. त्याने जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्यामुळे दमदार पुनरागमनाचा गौतम गंभीर व सेहवागचा दावा फोल ठरत आहे. उथप्पाच्या प्रत्येक फटकेबाजीत विविधता आहे. तो ग्लेन मॅक्सवेल व ड्वेन स्मिथसारखा आक्रमक नाही. मात्र, स्ट्राइक रेटमध्ये तो या दोघांच्या समीप आहे. रॉबिन उथप्पाला माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण आमरेचे मार्गदर्शन मिळत आहे. आमरे हे उथप्पासोबत प्रत्येक सामन्यागणिक प्रवास करतात. त्याने आयपीएल-7 मध्ये आतापर्यंत 400 पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. पंजाबच्या 20 वर्षीय वेगवान गोलंदाज संदीपने आतापर्यंत 17 बळी घेतले. त्याने अनेक सामन्यात पंजाबला विजय मिळवून दिला. संदीप हा विश्वविजेत्या भारतीय संघाचादेखील सदस्य आहे. त्याचे भविष्य हे उज्ज्वल असल्याचे दिसून येत आहे. पंजाबकडून ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, वोहरा, जॉर्ज बेली, मार्शसारखे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. मात्र, गोलंदाजीत संदीप शर्माची कामगिरी त्यांच्यापेक्षाही सरस आहे. पंजाबने फलंदाजीच्या बळावर सामने जिंकले असे नाही, तर संदीप अनेक सामन्यांत विजयाचा शिल्पकार ठरला आहे. उत्कृष्ट टेक्निक आणि नियंत्रणाच्या आधारे संदीप शर्मा हा यंदाच्या आयपीएलमध्ये यशस्वी ठरत आहे, अशा शब्दांत पाकचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वकार युनूस यांनी समालोचनादरम्यान संदीपवर स्तुतिसुमने उधळली होती. गोलंदाजी करण्याची त्याची शैली अधिक प्रभावी असल्याचेही युनूस यांनी कौतुकादरम्यान सांगितले. संदीप हा फुल लेंथ गोलंदाजी करतो. त्यामुळे चेंडू स्विंग होते आणि त्याचा फायदा हा संदीपला मिळतो. यामध्ये बदल करून चेंडू अधिक वेगाने टाकल्यास तो आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी गोलंदाज ठरेल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. उथप्पा व संदीप शर्मा हे प्रतिभावंत खेळाडू आगामी वर्ल्डकपसाठी घडत असल्याचे माझे मत आहे.