Home »Sports »Expert Comment» Ayaj Memon Write On Wrestling

कुस्ती ‘चीत’ झाल्यानंतर निर्माण झाले प्रश्न

अयाज मेमन | Feb 16, 2013, 23:49 PM IST

  • कुस्ती ‘चीत’ झाल्यानंतर निर्माण झाले प्रश्न

बीजिंगमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता भारतीय मल्ल सुशीलकुमारच्या मते, 2020 च्या ऑलिम्पिकपासून कुस्तीला दूर ठेवण्याचा आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीचा निर्णय फक्त मलाच नव्हे तर जगातल्या असंख्य कुस्तीप्रेमींना चकित करणारा आहे. भारताच्या संदर्भात आपण इतके म्हणू शकतो की या खेळात पुढच्या दोन ऑलिम्पिकमध्ये (2016, 2020) आपण अधिक पदकांची आशा करीत आहोत. मल्लांनी पदकाच्या आशेने जबरदस्त तयारी सुरू केली आहे. तसे पाहिले तर ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या यादीत भारत नेहमीच खूप मागे राहिला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्ती, बॉक्सिंग, बॅडमिंटन आणि नेमबाजीमध्ये सहा पदके जिंकली होती. यामुळे भारतीय खेळाडूंत जोश आणि उत्साह निर्माण झाला आहे. यामुळे आगामी 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये पदकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास भारतीय क्रीडाजगतात निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कुस्तीला बाहेर करण्याचा निर्णय निराशाजनक आहे. यामुळे खेळाडूंच्या स्वप्नांवर कु-हाडीचा घाव घातला गेला आहे. मात्र असे घडलेच कसे? माझ्या मते, भारतीय कुस्ती फेडरेशन आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निष्काळजीपणामुळेच असे घडले. या संघटनांनी आपल्या खेळाबाबत सतर्क राहायला हवे होते.

क्रीडा जगतात वारे कोणत्या दिशेने वाहत होते, आणि त्याची यांना कल्पना नव्हती, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कुस्तीशिवाय हॉकीवरसुद्धा बाहेर होण्याची तलवार लटकत होती, हे तर धक्कादायक आहे. कुस्तीच्या जागी मॉडर्न पेंटाथलॉनला प्राथमिकता दिली गेली. कुस्तीसुद्धा आधुनिक ऑलिम्पिकचा खेळ आहे. अशा परिस्थितीत मग या खेळाला बाहेर करण्याची शिफारस का करण्यात आली, याचे कारण शोधले पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये सर्वच खेळांना सामील केले जाऊ शकत नाही, हे सत्य आहे. मात्र, कोणत्या खेळाला ठेवायचे आणि कोणत्या खेळाला बाहेर करायचे, यात लॉबिंग तर होतेच. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा विचार केला तर ही संघटना आपसांतील भांडणामुळे याआधीच आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या ब्लॅक लिस्टमध्ये आली आहे. यामुळे आता मेपर्यंत आपल्याला प्रतीक्षाच करावी लागेल. मेमध्ये आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समिती पुन्हा मतदान घेईल. तोपर्यंत ईस्ट युरोप आणि रशियन लॉबी कुस्तीविरोधात आवाज बुलंद करेल, अशी आशा आहे. तोपर्यंत तरी कुस्ती चीतपट झालीच आहे. आणखी एक. आंतरराष्‍ट्रीय कुस्ती फेडरेशनचे (फिला) अध्यक्ष स्वित्झर्लंडचे राफेल मार्टिनेटी यांच्या निलंबनानंतर कुस्तीसमोर अडचणी वाढतील की कमी होतील, हे येणारा काळच सांगेल.

Next Article

Recommended