आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आशियाई’त सिंगला ‘सरदार’ व्हावे लागेल - अयाज मेमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार सुरुवात केली. हा कॉलम लिहीपर्यंत जितू रॉयने ५० मीटर पिस्‍तूल प्रकारात सुवर्ण, तर श्वेता चौधरीने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले होते. चार वर्षांपूर्वी ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १४ सुवर्णांसह एकूण ६५ पदके जिंकली. त्यामुळे या वेळी जास्त पदकांची अपेक्षा आहे. आशियाई स्पर्धा राष्ट्रकुलपेक्षाही आव्हानात्मक मानली जाते. त्यामुळे अपेक्षाही तशाच असतात. माझे असे मत आहे की, आशियाईत पदक िजंकणे हे भलेही मोठे आव्हान असेल, मात्र भारतीय खेळाडू गतवेळच्या तुलनेत कमीत कमी ७० पदके जिंकण्यात यशस्वी होतील. आशियाई स्पर्धेत ५१६ भारतीय भाग घेत आहेत. ही संख्या घटवण्यात आली असली तरी पदक संख्येत काही फरक पडेल, असे वाटत नाही. खेळाडूंची संख्या जास्त असणे गरजेचे नसून किती पदके मिळाली, याचे आकलन होणे अधिक महत्त्वाचे आहे. भविष्यातही विनाकारण खेळाडूंची संख्या वाढवली जाणार नाही, अशी आशा आहे.

या स्पर्धेत सुपरस्टार सुशील कुमार (कुस्ती), विजेंद्र सिंह (बॉक्सिंग) आणि लिएंडर पेस (टेनिस) सहभागी नाहीत. त्यांनी नक्की पदक जिंकले असते. कारण दुखापत असो किंवा वैयक्तिक, आपले नुकसान मात्र झाले. हे थोडके की काय, मार्चपास्टमध्ये भारतीय ध्वजवाहक कोण यावरून वाद निर्माण झाला. अनेक प्रमुख खेळाडूंनी सरावाच्या व्यग्रतेपायी नकार िदला. शेवटी हॉकी कर्णधार सरदारा सिंगकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली. ध्वजवाहक बनण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंनी यावरून धडा घेण्याची गरज आहे. अंतिम क्षणापर्यंत ध्वजवाहकच न ठरणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

२५ वर्षांपूर्वी ध्वजवाहकावरून काहीच वाद होत नसे. हॉकी कर्णधारच ध्वजवाहक बने. कारण हॉकीत भारताला पदकाची खात्री असे. आता परिस्थिती बदलली. कोणीच तयार होईना तेव्हा हॉकी कर्णधाराला ध्वजवाहक केले. हॉकीचा वरचेवर झालेला ऱ्हास, घटती लोकप्रियता ही प्रमुख कारणे आहेत. गत दोन दशकांत हॉकीत भारतीय संघाचा सातत्याने कामगिरीचा दर्जा सुमार होत आहे. त्याचाच फटका भारतीय हॉकीला क्रमवारीत बसत आहे. त्यामुळे भारतीय हॉकी संघाचा क्रम घसरत राहिला. भारतीय पुरुष संघ नवव्या, तर महिला १३ व्या क्रमांकावर आहेत. पुरुष गटात अग्रणी सात संघांत ऑस्ट्रेलिया, युरोप आणि लॅटिन अमेरिका आहे. यजमान द. कोरिया ८ व्या, पाकिस्तान ११ व्या, तर मलेशिया १३ व्या क्रमांकावर आहे. चीनला वरच्या २० मध्ये येता आले नाही. मात्र, त्याच्या उलटफेराची नेहमीच भीती असते. मग हॉकी असतो अथवा दुसरा कोणताही खेळ.
इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत सरदारा सिंग आणि कंपनीसमोर सुवर्णपदक जिंकणे आणि २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे कडवे आव्हान असेल. सरदाराला ‘सरदार’ व्हावेच लागेल. हॉकीला एका वेगळ्या नजरेतून पाहिले, तर भारत एफआयएचसाठी (आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना) सर्वात महत्त्वपूर्ण देश आहे. खेळाशिवाय वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आणि १२५ कोटी लोकांच्या या आवडत्या खेळाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आव्हान आहे. भारतात हॉकीची मुळे अधिकाधिक घट्ट व्हावीत, असे एफआयएचला वाटते. हॉकी खेळाडूंचे भविष्य सुरक्षित व्हावे, खेळाला नवे-नवे आयोजक मिळावेत, असेही वाटते. एफआयएचने या वेळी हॉकी नियमात अनेक बदल केले आहेत. नव्या नियमानुसार आता दोन सत्रांऐवजी १५-१५ मिनिटांचे चार सत्र असतील. हा नियम संघर्षात तरबेज आशियाई संघांसाठी लाभदायी आहे. कारण आशियाई खेळाडूंची क्षमता युरोपियनांच्या तुलनेत कमी असते. त्यांना थोडीशी विश्रांती मिळेल. आयोजकांना आकर्षित करणे हाही चार सत्र करण्याचा उद्देश आहे. कारण प्रत्येक सत्रानंतर टीव्हीवर जाहिराती दाखवायला सूट मिळते.
हॉकी स्टार सरदारा सिंग ध्वजवाहक तर झाला; मात्र आपला संघ सुवर्णपदक जिंकून तिरंगा फडकवणार काय, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सरदारासाठी आव्हान मोठे आहे; मात्र अशक्य नक्कीच नाही.