आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेसने वाढवला असता टीम इंडियाचा आत्मविश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वचषकापूर्वी धोनीला भेटण्यासाठी लिएंडर पेसला बोलावण्यासाठी चांगली संधी भारतीय संघ व्यवस्थापनाकडे होती. ही भेट विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकली असती. मात्र, ही संधी गमावली.

४१ वर्षीय पेस मागचे काही दिवस ऑस्ट्रेलियातच होता. मार्टिना हिंगिससोबत त्याने १५ वे ग्रँडस्लॅम जिंकले. या वयात ग्रँडस्लॅम जिंकणे, कोणासाठीही प्रेरणादायी ठरू शकते. ही वेळ विश्वचषकासाठी लय मिळवण्याची आहे, असे मोठी मालिका आणि आत्ममंथनानंतर धोनीने म्हटले होते. गोलंदाजांत उत्साह आणि आत्मविश्वास येण्यासाठी बूट कॅम्पची मदत घेण्यात आली. अशा परिस्थितीत पेसही महत्त्वपूर्ण आणि फायद्याचा ठरू शकला असता.

भारतीय क्रिकेटच्या मदतीसाठी बीसीसीआयने वेळोवेळी माजी क्रिकेटपटू, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली आहे. भारतीय संघ विश्वचषकाची तयारी करत असताना आणि पेस त्यांच्यासाठी सहज उपलब्ध होऊ शकला असता, अशा स्थितीत त्याची मदत घ्यायला हवी होती. पेसची सुरुवातच टेनिसपासून झाली असती आणि तो खेळासाठी पूर्ण फिट नाही, यावर चर्चा शक्य आहे. मात्र, जे पेसला ओळखत नाहीत, त्यांना माहिती नाही की तो क्रिकेटचा चाहता आहे. क्रिकेटच्या त्याच्या ज्ञानाबाबत शंका निर्माण होऊ शकत नाही. खरे तर क्रिकेटची माहिती हा मोठा मुद्दा नाही. जे रोज क्रिकेट खेळतात, त्यांच्यासोबत तंत्र आणि रणनीतीवर चर्चा, तर पेसनेसुद्धा केली नसती. हे त्यालाही कळते. पेस दुसर्‍या मुद्द्यासाठी उपयोगी ठरला असता. तो संघाचा आत्मविश्वास आणि बळ वाढवू शकला असता. आपल्या कारकीर्दीत त्याने कोणत्या आणि कशा संकटाचा सामना केला, तो संकटातून सावरून पूर्ण विश्वासाने पुन्हा कोर्टवर कसा उतरला, हे तो सांगू शकला असता.

अखेर पेसचे जीवन आणि खेळातील असे कोणते यश आहे, जे त्याला लिजेंड बनवतात. गेल्या दीड दशकात फक्त डबल्सचे सामने खेळूनसुद्धा सहकारी खेळाडू त्याला सर्वोत्तम का मानतात? त्याने एकेरीला केव्हाच सोडले आहे. तरीही खेळात असे काय आहे, जे त्याला सतत खेळण्यासाठी प्रेरणा देत असते? ...सलगपणे झुंज देत राहणे, जबरदस्त फिटनेस, मानसिक मजबुती आणि अखेरपर्यंत हार न मानण्याचे गुण... माझ्या मते हे सर्व त्याच्या नैतिक गुणांची देण आहे. अखेरच्या दोन मुद्द्यांना खेळात खूपच अधिक महत्त्व आहे. माझ्या मते पेससाठी खेळातील समर्पणच सर्व काही आहे.

खेळात महत्त्वाचे म्हणजे त्याच्यावर प्रेम जडले पाहिजे. मात्र, आजही त्याला वयाच्या विशीत जशी आवडायची तशी प्रतिद्वंद्वता आजही आवडते, हे पेसच्या यशाचे मूळ कारण आहे. तो फक्त आनंदासाठी खेळत नाही, तर जिंकण्यासाठी खेळतो. यामुळेच तो वयाच्या ४१ वर्षीसुद्धा टेनिस कोर्टवर कट्टर विरोधक आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक फिटनेससाठी कठोर मेहनतीची गरज असल्याचे त्याला माहिती आहे. यामुळे आपल्या प्रत्येक लढतीसाठी तो पूर्ण प्लॅन करताे. यात विरोधक, कोर्ट, खेळण्याची स्थिती यावर लक्ष दिले जाते.

भारताला वर्ल्डकपसाठी अशीच योजना आणि तिला कार्यान्वित करण्याची गरज आहे. खेळण्याची शैली किंवा क्षमता, हे प्रश्न नाही, तर खेळावर फोकस आणि स्वत:ला प्रेरित करण्याचा आहे. हे ऐकण्यास साधारण वाटत असेल, मात्र मोठ्या स्पर्धांत घाबरल्यामुळे अनेक मोठ्या खेळाडूंचे लक्ष भरकटू शकते. असे घडले तर खेळाडूचा आत्मविश्वासही खालावतो. ऑस्ट्रेलियात कसोटी आणि तिरंगी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघात असेच लक्षण दिसत आहेत. खेळात बरेच काही खूप लवकर बदलत असते. आता धोनीवर बरेच काही अवलंबून आहे की तो खेळाडूंना कसा प्रेरित करतो. लिएंडर पेसशी संपर्क झाला असता, तर या स्थितीत मोठा बदल झाला असता, हे मी विश्वासाने सांगू शकतो.